esakal | दिल्लीतील नाल्यांत आढळले 11 मृतदेह, मृतांची संख्या...
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

दंगलग्रस्त भागामध्ये फिरून पोलिसांनी आता नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच दंगेखोरांना हुडकणे आरंभले आहे. याअंतर्गत पोलिसांना एक मृतदेह गोकुळपुरीच्या नाल्यात आढळला. याच नाल्यात गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला होता.

दिल्लीतील नाल्यांत आढळले 11 मृतदेह, मृतांची संख्या...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हिंसेच्या तांडवामुळे होरपळलेली ईशान्य दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी नाल्यांमध्ये मृतदेह सापडण्याच्या घटना सुरुच आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये तब्बल 11 मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 47वर पोहचली आहे. 

दिल्ली पोलिसांनी दंगल पेटविणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहिमा सुरु आहेत. सोबतच दंगलीतील क्रौर्य आणि संकटकाळात दिसून आलेल्या मानवतेच्या कहाण्याही समोर येत आहेत. दिल्लीच्या गोकुळपूरी आणि भागीरथ विहारमध्ये पोलिसांना नाल्यामध्ये सोमवारी तीन मृतदेह आढळून आले.

दंगलग्रस्त भागामध्ये फिरून पोलिसांनी आता नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच दंगेखोरांना हुडकणे आरंभले आहे. याअंतर्गत पोलिसांना एक मृतदेह गोकुळपुरीच्या नाल्यात आढळला. याच नाल्यात गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला होता. तर भागीरथी विहारच्या नाल्यामध्ये दोन मृतदेह सापडले. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी जोरदार खळबळ उडाली आहे. यामुळे मृतांची संख्या 47 झाली असून जखमींची संख्या देखील 300 वर पोहोचली आहे.
 
शाहिनबागमध्ये जमावबंदी 
दंगल आटोक्‍यात न आल्यामुळे राजकीय टिकेची झळ बसलेल्या दिल्ली पोलिसांनी नागरिकत्व कायदा विरोधी निदर्शनांचे केंद्रबिंदू असलेल्या शाहिनबागमध्ये बंदोबस्त वाढविला आहे. या भागामध्ये पोलिसांनी आज जमावबंदीचे १४४ कलम लागू केले. तसेच रस्त्यावर ठिय्या देणाऱ्या महिलांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. या भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात केला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे दिल्ली आणि नोएडा भागाला जोडणारा कालिंदी कुंज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दिल्ली सोबतच हरियाना तसेच उत्तर प्रदेशातून दिल्लीत येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

loading image