
Sextortion : सेक्सटॉर्शन रॅकेटचा दिल्लीत पर्दाफाश
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘सेक्सटॉर्शन’च्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून कॅलिफोर्नियातील एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
या प्राध्यापकाला त्याचे व्हिडिओ आणि महिलेसोबतचे अश्लील चॅट व्हायरल करण्याची धमकी देऊन ४८ हजार डॉलर उकळल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील तपाससंस्था ‘एफबीआय’कडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने राहुलकुमार या दिल्लीतील असोला भागात राहणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
दरम्यान ज्या महिलेने या प्राध्यापकांशी अश्लील संभाषण साधले तसेच व्हिडिओ पाठविण्यासाठी प्रवृत्त केले त्या महिलेचा कसून शोध घेतला जात आहे. संबंधित महिला ही फेसबुकच्या माध्यमातून प्राध्यापकाच्या संपर्कात होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची मैत्री झाली होती. संबंधित महिलेने हे चॅट राहुलकुमार या तिच्या सहकाऱ्याकडे पाठविले होते. राहुलकुमार हेच व्हिडिओ आणि चॅटच्या बळावर संबंधित प्राध्यापकाकडून पैसे उकळण्याचा कट आखत होता.
व्हिडिओ व्हायरलची धमकी
राहुल आणि त्याच्या महिला सहकाऱ्याने अमेरिकेतील प्राध्यापकाला त्याचे व्हिडिओ काही पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्याची धमकी दिली होती. तो मेलच्या माध्यमातून या प्राध्यापकाला धमकी देत होता. हे व्हिडिओ डिलिट करण्याच्या बदल्यात राहुलने प्राध्यापकाकडे पैसे आणि काही मौल्यवान वस्तू मागितल्या होत्या. साधारणपणे वर्षभराच्या अवधीमध्ये या प्राध्यापकाकडून त्यांनी ४८ हजार डॉलर (३८ लाख रुपये) उकळल्याचे समोर आले आहे.
महागड्या आयफोनची मागणी
लाखो रुपये उकळल्यानंतर देखील राहुलचे समाधान झाले नाही त्याने त्या प्राध्यापकाकडे आयफोन, चार्जर आणि हेडसेटची मागणी केली होती. यानंतर मात्र त्या प्राध्यापकाने अमेरिकेच्या जस्टिस विभागाकडे तक्रार केली होती. पुढे याच विभागाने हे प्रकरण ‘एफबीआय’कडे सोपविले होते. ‘एफबीआय’ने याबाबतची माहिती सीबीआयला कळविली होती.