Delhi Pollution : राजधानीत ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Pollution

Delhi Pollution : राजधानीत ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना काळाप्रमाणे वर्क फ्रॉम होम धोरण लागू होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता दिल्ली सरकारने नागरिकांना घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वाहनांपासून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीत बुधवारी प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली. त्यामुळे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीकरांना घरातूच काम करण्याचे आवाहन केले आहे. खासगी गाड्यांचा वापर शक्यतो टाळावा असे म्हटले आहे. प्रदूषणात ५० टक्के वाटा हा गाडीतून निघणाऱ्या धुरांचा आहे. तसेच दिल्लीतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेला काही नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

गोपाल राय म्हणाले, की प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न स्वत:पासून सुरू करावे लागतील. आपल्या जे काही करणे शक्य आहे, ते करावे लागेल. दुसऱ्याच्या कामावर अवलंबून राहून वेळ दवडण्यात अर्थ नाही. काल दिल्ली सरकारने भाजप मुख्यालयास बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावली होती. तसेच खासगी कंपनी लार्सन ॲड टुब्रो लिमिटेडला बांधकाम आणि पाडकामाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच लाखाचा दंड ठोठावला होता.

ऑपरेशन क्लिन दिल्ली अभियान सुरू

देशाच्या राष्ट्रीय राजधानीने स्वच्छतेकडे आणि साफसफाईकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून आगामी ‘जी-२०’ च्या बैठकीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या मनावर दिल्लीचा चांगला प्रभाव पडेल, असे मत नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मांडले. त्यांच्या हस्ते काल ‘ऑपरेशन क्लिन दिल्ली’ अभियानाला सुरुवात झाली.

पर्यावरणमंत्र्यांच्या सूचना

  • राजधानी दिल्लीत बांधकामाशी निगडित असलेले फोटो ग्रीन दिल्ली ॲपवर पाठवा

  • कामावर जाणाऱ्या नोकरदारांनी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा

  • रस्त्यावर वाहने कमीत कमी आणावीत. शक्यतो घरातूनच काम करावे

  • कोळसा किंवा लाकूड जाळले जात असेल तर सरकारला तत्काळ कळवा

  • थंडीपासून बचाव करण्यासाठी वीज हिटरचा वापर करावा, शेकोटी करू नये

  • फटाके उडविण्याचे टाळावे. सध्याच्या खराब वातावरणात फटाके उडविणे पर्यावरणाला आणखी मारक ठरू शकते.