esakal | दिल्लीला चांगले दिवस येणार काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीला चांगले दिवस येणार काय ?

दिल्लीला चांगले दिवस येणार काय ?

sakal_logo
By
विजय नाईक,दिल्ली

5 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या डायलॉग अँड डेव्हलपमेन्ट आयोगाने द टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक पानभर जाहिरात दिली. जाहिरातीच्या वरच्या भागात कायापालट झालेल्या ऐतिहासिक चांदणी चौकाचे सुंदर छायाचित्र आहे. तर खालच्या भागात ठळक अक्षरात छापलय, ``हाऊ विल दिल्लीज स्ट्रीट्स बिकम लाईक दोज ऑफ युरोप.’’ दिल्लीचं परिवर्तन करून राजधानीतील रस्ते लंडन व न्यू यॉर्कसारखे करण्याचा मनोदय त्यातून व्यक्त करण्यात आला. तसेच त्या दिवशी एक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लंडन, न्यू यॉर्क, सोल, बोगोटा येथील तज्ञांनी तीत भाग घेतला. मुख्य अतिथी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनिष सिरोदिया व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी व संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी भाग घेतला.

2018 च्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील रस्त्यांची लांबी 17,596 कि.मी. आहे. हे रस्ते अर्थांतच लंडन, न्यू यॉर्क, दुबई व युरोपातील चकचकीत व तुळतुळीत रस्त्यांसारखे नाहीत. किंबहुना, दिल्लीतील काही भागातून फिरताना आपण आफ्रिकेतील मागासलेल्या देशात तर आलो नाही, अशी दाट शंका येते. जो देशाचा आजार, तोच दिल्लीचाही आहे. महानगर टेलिफोन, रस्ते बांधणी व निर्माण खाते, दिल्ली जल प्राधिकरण, गॅस व वीज पुरविणाऱ्या कंपन्या, बिल्डर्स आदी कोणतीही दुरूस्ती व बांधकाम करताना रस्त्यांची व परिसरांची जी काही वाट लावतात, त्याची तुलना युरोप, अमेरिका व चीन, दक्षिण आशियातील देशांतील प्राधिकरण व रस्त्यांबरोबर करता येणार नाही. महिनोन महिने खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती होत नाही, असे चित्र राजधानीत दिसते. यातील वाखाणण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती मेट्रो बांधताना नेहमीच्या वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी मेट्रो रेल्वे प्राधिकरणाने घेतली. त्यामुळे, वाहतूक विस्कळीत झाली नाही. आजही होत नाही.

दिल्ली सरकारने 540 कि.मी च्या रस्त्यांचा पूर्णतः कायापालट करण्याचे ठरविले असून, पादचाऱ्यांसाठी तसेच वृद्ध व मुलांसाठी अधिक सोयीचे व सुरक्षित करण्यावर भर राहणार आहे. डायलॉग अँड डेव्हलपमेन्ट आयोगाचे उपाध्यक्ष जस्मिन शहा यांच्यानुसार, ``जगातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांची आधुनिक रचना करण्याचे काम पंधऱा ते वीस वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. दिल्लीत जागतिक दर्जाचे रस्ते बांधण्याचा निर्धार केजरीवाल यांनी केलाय,’’ असे ते म्हणाले. सोलमधील (दक्षिण कोरिया) तज्ञ ग्येंगचुल कि म्हणाले, की सोलमधील फ्लायओव्हर व फूटब्रिजेस अनेकांना वापरता येत नव्हते, म्हणून पादचाऱ्यांसाठी मोठमोठे चौक, रस्ता ओलांडणे सोपे व्हावे, यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, बसेससाठी ठराविक मार्ग (लेन) याची निर्मिती केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली. सिंगापूरच्या भूविकास व वाहतुक प्राधिकरणाचे संचालक ऑंग यू जीन म्हणाले, की सिंगापूरला `कार लाइट नेशन ( किमान चारचाकी (मोटारी) असणारा देश)’ बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. ``वाहतुक संकुलांची निर्मिती करून वाहने व लोकांना अधिकाधिक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात मेट्रोसेवेला सर्वात महत्व आहे.’’

हेही वाचा: पीडित कुटुंबियांना उत्तर प्रदेशपेक्षा जास्त मदत देणार पंजाब आणि छत्तीसगढ

न्यू यॉर्कच्या वाहतुक विभागाचे माजी उपआयुक्त मायकेल रिपोलोगल यांनी एकीकृत वाहतुकीच्या निर्मितीवर भर दिला. न्यू यॉर्कमध्ये `स्पीड कॅमेरा योजना’ लागू झाल्यापासून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे एकदा चलान (दंड) झाल्यावर त्यांनी पुन्हा कधी वेगाचे उल्लंघन केल्याचे दिसले नाही, हा अनुभव सांगितला. करोनाच्या साथीचाही वाहतुक, रेस्टॉरन्ट्स आदींवर परिणाम झाला. अमेरिकेत मोटारसायकल (दुचाकी) वाहनांचा अधिक विकास केला जात आहे. लंडनच्या नगररचना विभागाचे संचालक अलेक्स विल्यम्स यांच्यामते, ``स्ट्रीट फॉर ऑल (सर्वांसाठी रस्ते) ही योजना राबविण्यात येत असून, लोकांनी जास्तीजास्त सायकल, बस आदीचा वापर करावे, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. खासगी वाहनांचा वापर कमीत कमी असावा, यासाठी जनतेला जागरूक केले आहे.’’

दिल्लीचे रस्ते प्रशस्त, रुंद आहेत. गेल्या साडे चार वर्षात केजरीवाल यांच्या सरकारने 23 फ्लायओव्हर्स (उड्डाण पूल) बांधले. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पंधरा वर्षात 70 फ्लायओव्हर्स बांधले. तरीही दिल्लीच्या वाढत्या वाहतुकीला ते अपूरे पडत आहेत. म्हणूनकी काय, पूर्व दिल्लीत आता निरनिराळ्या भागाला जोडणाऱे उड्डाण पूल बांधण्याचे काम जोरात चालू आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांचे बांधकाम खंडित झाले होते.

हेही वाचा: काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही; केरळात बड्या नेत्याचा राजीनामा

दरम्यान, नोव्हेंबर जवळ येतोय, तसे दिल्लीतील संभाव्य प्रदूषणाच्या धोक्याच्या घंटा वाजू लागल्यात. उत्तर प्रदेश, हरियाना व पंजाब मध्ये धान्यतृण जाळण्याचे दिवस जवळ आलेत. सप्टेंबरपासून ते जाळणे सुरू झाले आहे. त्याचा धूर अद्याप दिल्लाला पोहोचलेला नाही. परंतु, हिवाळा जवळ येईल, तसे त्याचे प्रमाण वाढेल. तज्ञांच्या मते, ``ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तृण जाळण्याच्या 16,500 घटना घडतील.’’ पवन गुप्ता या शास्त्रज्ञानुसार, ``1 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान पंजाबमध्ये 268 व हरियानात 47 तृण जाळण्याचे प्रकार घडले.’’

भारतीय शेती संशोधन संस्थेने विकसित केलेले जैविक स्टबल बायो डिकंपोजर हरियानातील सहा लाख एकर्स व पंजाबमधील 7413 एकर्सवर वापरण्यात येईल. बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीचे नियंत्रण करण्यासाठी 17 नियंत्रणके केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, निरनिराळया कारणांमुळे होणाऱ्या दिल्लीतील 150 प्रदूषण स्थळांची नोंद करण्यात आली असून, त्यात दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, मध्य दिल्ली, शहादरा, नवी दिल्ली आदींचा समावेश आहे.

केजरीवाल यांनी प्रदूषण ऱोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात दिवाळीत फटाक्यांवर बंदी, स्मॉग टॉवरची उभारणी, युद्ध पातळीवर काम करणारे हरित केंद्र व वेळ आल्यास वाहनांसाठी ऑड अँ इव्हन नंबर असलेल्या गाड्यांची दिवसाआड वाहतूक आदींचा वापर केला जाईल. गेल्या अर्ध शतकापेक्षा अधिक काळ पडला नव्हता एवढा पाऊस दिल्लीत यंदा पडला. त्यामुळे तीव्र उन्हाळा भासला नाही. दुपारचा उकाडा सोडला, तर दिल्लीतील हवा अल्हाददायक आहे. परंतु, हिवाळा जवळ येतोय, तशी दिल्लीकरांची चिंता वाढती आहे. करोनाची लाट सरलेली नाही, परंतु, तिची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे, जनतेचे सामान्य व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. तेवढाच काय तो दिलासा.

loading image
go to top