Rahul Gandhi News: काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ला पुन्हा सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi News

Rahul Gandhi News: काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ला पुन्हा सुरुवात

जालंधर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज पंजाबमधील जालंधरपासून पुन्हा सुरुवात झाली. जालंधरमधील खालसा महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेल्या यात्रेत अनेक जण सहभागी झाले.

काँग्रेस खासदार संतोखसिंग चौधरी यांचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाल्याने काल(ता.१४) यात्रा २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली होती.

दरम्यान, चौधरी यांच्यावर आज जालंधरमधील धालिवाल या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राहुल गांधी उपस्थित होते. त्यानंतर, त्यांनी जालंधरमधील देवी तालाब मंदिरात प्रार्थना करून दुपारी तीन वाजता यात्रेला पुन्हा सुरुवात केली.

गायक सिद्ध मुसेवाला यांचे वडील बलकौरसिंग हेही यात्रेत सहभागी होत गांधी यांच्यासह काही अंतर चालले. मुसेवाला यांची गेल्यावर्षी मे महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वॉरिंग, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा, माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यासह पक्षाचे अन्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही यात्रेत सहभागी झाले.

यात्रेचा आजचा मुक्काम आदमपूरमध्ये असून, त्यानंतर उद्या(ता.१६) सकाळी यात्रा पुढे रवाना होईल. गेल्या आठवड्यात, बुधवारी भारत जोडो यात्रेने पंजाबमध्ये प्रवेश केला.

तमिळनाडूत कन्याकुमारीहून गेल्या वर्षी सात सप्टेंबरला सुरू झालेल्या या यात्रेचा येत्या ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये समारोप होईल.