Shivraj Singh Chouhan News : मध्य प्रदेश भाजपमध्ये वाढती खदखद ‘‘शिवराजसिंह ‘चेहरा‘ नकोत'‘ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Singh Chouhan News

Shivraj Singh Chouhan: मध्य प्रदेश भाजपमध्ये वाढती खदखद ‘‘शिवराजसिंह ‘चेहरा‘ नकोत'‘

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने निश्चित केलेले ‘अबकी बार २०० पार’ हे लक्ष्य साध्य करण्याच्या रस्त्यात सत्ताधारी पक्ष संघटनेतूनच अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या गटाच्या महत्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली असतानाच दुसरीकडे खुद्द भाजप आमदारांमध्येच ‘ आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुन्हा मामा (शिवराजसिंह चौहान) नकोत' असा जोरदार मतप्रवाह आहे.

दरम्यान जर चेहरा म्हणून आगामी रणधुमाळीत शिवराजसिंह नसतील व केंद्रीय नेतृत्वाला राज्यात भाजप-संघ रचनेतीलच नवा चेहरा द्यायचा असेल तर अलीकडे ‘दिल्ली‘च्या विशेष जवळचे झालेले गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही वरिष्ठ भाजप नेत्यांनी दावा ठोकला आहे.

केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावर भाष्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मात्र भाजप नेतृत्वापर्यंत पोहोचलेले अहवाल सांगतात की बुंदेलखंड, ग्वाल्हेर-चंबळ, माला आणि महाकौशल यासारख्या काही प्रदेशांमध्ये गटबाजी रोखली गेली नाही तर पक्षाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल.

आगामी निवडणुकीत शिंदे यांच्यासमवेत भाजपमध्ये आलेल्या काँग्रेसच्या माजी नेत्यांसाठी मते मागण्यास आमच्या (भाजपच्या) केडरची इच्छाच नाही हा गंभीर मुद्दा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भरीत भर म्हणजे राज्यातील किमान डझनभर खासदार विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागत आहेत.२०२४ मध्ये दिल्लीकडून तिकीट मिळेल याचा भरवसा

भाजप खासदारांना नाही.

या वर्षाच्या अखेरीस २३० सदस्यीय मध्य प्रदेश विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०७ जागा मिळाल्या.

काँग्रेसने ११४ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०२० मध्ये भाजपच्या जहाजात रातोरात उडी मारलेले शिंदे व त्यांच्या गटातील सुमारे २ डझन खासदारांच्या साथीने भाजप नेतृत्वाने आॅपरेशन कमळ तडीस नेऊन कमलनाथ सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढून घेतली व राज्यातील सत्ता पुन्हा मिळविली.

पण मुख्यमंत्रीपदासाठी चौहान यांच्याशिवाय अन्य चेहरा दिसत नसल्याने त्यांच्याकडे राज्याच सूत्रे सोपविणे भाजप नेतृत्वाला भाग पडले.

आगामी निवडणुकीत भाजपने सत्ता कायम ठेवल्यास सरकारचे नेतृत्व करण्यासाठी "नवा चेहरा" हवा आहे, असे भाजपमधील बहुसंख्य नेत्यांचे व केडरचेही मत असल्याचा दावा सूत्रांनी केला.

२०१८ मध्ये भाजपचा पराभव झाला तेव्हा चौहान यांचेच नेतृत्व असूनही भाजपने राज्यातील जनादेश गमावला होता. आता घायकुतीला आलेल्या इच्छुक वरिष्ठ भाजप नेत्यांच्या मते पक्षकार्यकर्त्यांना नेतृत्वाकडून हेच "आश्वासन" हवे आहे

की राज्य संघटनेची "वरिष्ठ स्तरावर पुनर्रचना" केली जाईल व ती निवडणुकीपूर्वी केली जाईल.शिंदे गट राज्य भाजपमध्ये अजूनही म्हणावा तेवढा ‘समरस' झाला नसल्याचे उदाहरण हे की भाजप कार्यकर्ते आता "बाहेरील" आमदारांसाठी मते मागायला तयार नाहीत असे राज्यातील फीडबॅक आहेत.

शिंदे गटाची राज्य भाजप-संघाच्या केडरबरोबर ‘समरसता‘ कधी होणार याचे उत्तर कोणाकडे नाही व आता त्यासाठी वेळ कमी उरल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरी बाब म्हणजे राज्यातील जवळपास डझनभर भाजप खासदारदेखील विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागत आहेत. ज्या भाजप नेत्यांनी संसदेत तीनपेक्षा जास्त वेळा संसदेत भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांची तिकीटे २०२४ मध्ये दिल्ली कापणार अशी जोरदार हवा आहे.

शिवराजसिंह चौहान निश्चितपणे मनातून अस्वस्थ आहेत. नुकतीच मी त्यांची विशेष मुलाखत घेतली तेव्हाही त्यांच्या चेहऱयावर न दिसणारी अस्वस्थता जाणवत होती.

- सईद अंसारी- राजकीय विश्लेषक