
Desh : भूकंपग्रस्तांसाठी ‘नासा’चा पुढाकार
अंकारा : तुर्की आणि सीरियात सोमवारी भूकंपाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २४ हजारच्या वर गेली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मदत व बचाव कार्य अथकपणे सुरू आहे. यासाठी अमेरिकेची ‘नासा’ पृथ्वी निरीक्षण रडारकडून आलेला महत्त्वाची माहिती मदत पथकांना पुरवित आहे. दरम्यान, कामानिमित्त तुर्कीला गेलेले भारतीय नागरिक विजय कुमार यांचा भूकंपात मृत्यू झाल्याचे आज परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ते ६ फेब्रुवारीपासून बेपत्ता हाेते आणि मालात्या येथील हॉटेेलमध्ये थांबले होते. आज त्यांचा मृतदेह आढळून आला.
सर्व प्रकारच्या हवामानात आणि दिवस-रात्र पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या ‘सिन्टेटिक ॲपरचर रडार’ (एसएआर)चा वापर ‘नासा’ तुर्कीतील भूकंपग्रस्त भागातील बचाव पथकांना सहाय्य करण्यासाठी करीत आहे. भूकंपानंतर जमीन कशी हलली आणि भूरचनेत कसा बदल झाला याच्या निरीक्षणासाठी या ‘रडार’चा वापर केला जात असल्याचा माहिती ‘नासा’ने दिली आहे.
मदतकार्याला हातभार लावण्यासाठी ‘नासा’ने हवाई छायाचित्र व माहिती दिली आहे. सिंगापूरमधील ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’ आणि ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोटरीच्यावतीने भूकंपापूर्वीची आणि भूकंपानंतरची छायाचित्रांच्या मदतीने नुकसानाचा प्रातिनिधिक नकाशा तयार केला. भूप्रदेशाच्या रचनेत कसा बदल झाला आहे, हे पाहण्यासाठी रडारने काढलेल्या भूकंपापूर्वीच्या आणि भूकंपानंतरच्या छायाचित्राशी या नकाशाची तुलना करण्यात येत आहे.
पृथ्वी निरीक्षक ‘एसएआर’कडून मिळणारी महत्त्वाची माहिती शोध पथकांना पुरविण्यासाठी तज्ज्ञ कसोशीने प्रयत्न करीत आहे.’’
बिल नेल्सन, प्रशासकीय अधिकारी, नासा