शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच देवेंद्र फडणवीसांचा टि्वट बॉम्ब

sharad pawar devendra fadnavis.jpg
sharad pawar devendra fadnavis.jpg

मुंबई- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बचावाकरिता आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या एका संदर्भावरुन 100 कोटींच्या खंडणीचे प्रकरण आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोना झाल्यामुळे दि. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाइन होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले होते. दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत दि. 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा देशमुख यांनीच शेअर केलेला व्हिडिओ रिटि्वट केला आहे. त्याचबरोबर सुरक्षारक्षकांसह, माध्यम प्रतिनिधींसमोर पत्रकार परिषद झाली होती. ही व्यक्ती नेमकी कोण, असा सवालही त्यांनी शरद पवार यांना केला आहे. 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपाचे शरद पवार यांनी खंडन केलं आहे. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब आणि विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले. गृहमंत्र्यावर आरोप करत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी त्यांनी अनिल देशमुख हे 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाइन असल्याचे म्हटले. 

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित टि्वट करुन शरद पवार यांनाच उलट सवाल केला आणि 15 तारखेला पत्रकार परिषद घेतलेली व्यक्ती कोण होती, असा उपहासात्मक सवाल त्यांनी केला. 

त्याचबरोबर फडणवीस यांनी आणखी एक टि्वट करत एसएमएसचा दाखला दिला आहे. ते म्हणाले की, परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असा सवाल त्यांनी केला. 

अनिल देशमुख यांनी दि. 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले होते. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असेही त्यांनी म्हटले होते. लता मंगेशकर आमचे दैवत असून सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उदभवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत, असे त्यांनी त्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com