esakal | 'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे'; मन हेलावणारा व्हिडीओ

बोलून बातमी शोधा

'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे'; मन हेलावणारा व्हिडीओ
'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे'; मन हेलावणारा व्हिडीओ
sakal_logo
By
शर्वरी जोशी

'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे', असं म्हणत आर्त विनवणी करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मध्य प्रदेशतील एक कोविड सेंटरमधील रुग्णाने हा व्हिडीओ शेअर केला असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना त्याने टॅग केलं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून या रुग्णाने कोविड सेंटरमधील दुरावस्था व घरची हालाखीची परिस्थिती यांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नागदा येथील अनिल साहनी यांचा असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर अमलतास येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनिल यांना त्रास होत असून आपलं काही बरंवाईट झालं तर आपल्या धाकट्या बहिणीला कोण पाहणार अशी चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

"सध्या कोणतीच अत्यावश्यक सुविधा इथे उपलब्ध नाहीये. मला मरायचं नाहीये. मला माझ्या बहिणीला भेटायचं आहे. प्लीज माझी मदत करा. कोणतंच प्रशासन माझी मदत करायला तयार नाही. इथे कोणतीच व्यवस्था नाही. माझं काय होईल याचा काहीच अंदाज नाही. ना कोणी पाहायला आहे ना लक्ष द्यायला. इथे प्रत्येक जण कसंबसं जगत आहे. त्यामुळे माझं काय होईल मला माहित नाही. परंतु, माझ्या बहिणीकडे लक्ष द्या. प्लीज माझी मदत करा", असं म्हणत अनिलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, अनिल यांच्यावर गेल्या ६ दिवसांपासून अमलतास येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या आई-वडिलांचं यापूर्वीच निधन झालं असून त्यांच्या पश्चात अनिल आणि त्याची धाकटी बहीण आहे. अनिलची बहीण २० वर्षांची आहे. मात्र, तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे ती गेल्या दीड वर्षांपासून डायलसिसवर असल्याचं सांगण्यात येतं.