
उत्तराखंडच्या शाळेत वेद, रामायणासह गीता शिकवावी : शिक्षणमंत्री रावत
डेहराडून : उत्तराखंडमधील शाळांमध्ये आता वेद, रामायण आणि गीता शिकवली जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करून लागू करण्यात येईल. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धनसिंह रावत (Uttarakhand Education Minister) यांनी सांगितलं.
हेही वाचा: भगवद् गीता सर्वांच्या वर, बायबलसोबत सांगड घालू नका : कर्नाटक मंत्री
नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भारतीय इतिहास आणि परंपरांच्या आधारे तयार करण्यात यावा. वेदपुराण आणि गीता यांच्यासोबत स्थानिक लोकभाषांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. लवकरच नवीन अभ्यासक्रम तयार केला जाईल आणि नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असे शिक्षणंत्री धनसिंह रावत म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन अभ्यासक्रमात उत्तराखंड चळवळीचा इतिहास आणि महान व्यक्तिमत्त्वेही शिकवली जाणार आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये देखील बारावीपर्यंतच्या अभ्याक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये देखील अभ्यासक्रमात रामायण किंवा भगवद् गीतेचा समावेश करू, असं कर्नाटकचे शिक्षणंत्री बी. सी. नागेश म्हणाले होते. पण, याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलून आम्ही निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, कर्नाटकमध्ये बायबलवरून वाद रंगला होता. एका शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्याक्रमात बायबलचा समावेश करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ख्रिश्चनीकरण होत असल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता. पण, शिक्षण विभाग याची चौकशी करेल असं बी. सी. नागेश म्हणाले होते.
Web Title: Dhansing Rawat On Ved Ramayan Gita Taught To Student In Uttarakhand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..