डॉक्‍टर परत या; संपकऱ्यांसमोर ममतांचे लोटांगण 

doctor
doctor

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला दुर्दैवीच असल्याचे सांगत याप्रकरणी आमच्या सरकारने एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

तत्पूर्वी या संपकरी डॉक्‍टरांनी जशास तशी भूमिका घेत राज्य सरकारचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, त्यानंतरच चर्चा केली जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने हा संप आज सलग पाचव्या दिवशीही सुरूच होता, यामुळे प. बंगालप्रमाणेच देशभरात अनेक ठिकाणांवर रुग्णांचे हाल झाले. येथील "एनआरएसएम' वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्‍टरांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे सर्व जण आंदोलन करीत आहेत. 

राज्यातील राजकीय हिंसाचार आणि डॉक्‍टरांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे, गृहमंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. आंदोलनकर्त्या डॉक्‍टरांनी मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्याबरोबरच त्यांच्यासमोर सहा अटीही ठेवल्या होत्या. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील सफदरजंग आणि "ऑल इंडिया इन्स्ट्यिूट ऑफ मेडिकल सायन्सेस'मधील (एम्स) निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही ममतांना अल्टिमेटम देत प. बंगालमधील डॉक्‍टरांच्या मागण्या मान्य करा अन्यथा राष्ट्रव्यापी आंदोलनाला सामोरे जा, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही सचिवालयामध्ये जाणार नाही आहोत, त्यांनाच माफी मागण्यासाठी नील सरकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये यावे लागेल. "एसएसकेएम' रुग्णालयामध्ये माध्यमांशी बोलताना ममतांनी जी वक्तव्ये केली होती, त्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी ज्युनिअर डॉक्‍टरच्या फोरमचे प्रवक्ते अरिंदम दत्ता यांनी केली. दरम्यान, आंदोलनकर्त्या डॉक्‍टरांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील तीनशेपेक्षाही अधिक डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत. 

रुग्णांचे हाल 
पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले असून, लोकांमधील असंतोषही वाढत चालला आहे. मिदनापूरमध्ये एका मुलाचा उपचाराअभावी रुग्णालयातच मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी रस्त्यावरच त्याचा मृतदेह ठेवून आज आंदोलन केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्‍टरांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये त्यांनी यापूर्वीचा घटनाक्रम मांडत आपण डॉक्‍टरांचीच बाजू घेतल्याचा दावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com