दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

पीटीआय
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. मात्र त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करावयाची असल्याने त्यांना आज व उद्या रुग्णालयामध्येच ठेवण्यात येणार आहे. येथील डॉक्‍टरांकडून त्यांची उत्तम काळजी घेण्यात येत आहे

मुंबई - प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी व अभिनेत्री सायरा बानु यांनी दिली आहे. 93 वर्षीय दिलीप कुमार यांच्या उजव्या पायास सूज आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना काल (बुधवार) सकाळी तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

"दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. मात्र त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करावयाची असल्याने त्यांना आज व उद्या रुग्णालयामध्येच ठेवण्यात येणार आहे. येथील डॉक्‍टरांकडून त्यांची उत्तम काळजी घेण्यात येत आहे,'' असे सायरा यांनी सांगितले.

भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक शिखर असलेल्या दिलीप कुमार यांनी 1998 मध्ये किला या चित्रपटामध्ये अखेरची भूमिका केली आहे. 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते; तर 2015 मध्ये त्यांना "पद्म विभूषण'ने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या अनेक चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मधुमती, देवदास, अंदाज, मुघल-इ-आझम, गंगा जमुना, राम और श्‍याम आणि कर्मा या चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Kumar doing fine, says Saira Banu