
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर भारत सरकारने वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानबरोबरील सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्याचा आणि भारतातील उच्चायुक्तालयातील सैन्य सल्लागार पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेत पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. भारतातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनाही आठवडाभरात देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. इतरही काही महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेत सरकारने ‘दहशतवाद सहन केला जाणार नाही’ असा पाकिस्तानला खणखणीत इशारा दिला आहे.