
काका-पुतण्यात पुन्हा ‘दीवार’
नवी दिल्ली : सपचे प्रमुख अखिलेश यादव आणि काका शिवपाल यांच्यातील मतभेदांची दरी आणखी रुंदावली आहे. बुधवारी शिपवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. शिवपाल यांना राज्यसभेसाठी संधी, त्यांचा मुलगा आदित्य याला आझमगढमधून उमेदवारी अशा पर्यायांबाबत चर्चा झाल्याचे समजते.शिवपाल यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच सपमधून बाहेर पडत वेगळा पक्ष काढला. त्यांनी प्रगतिशील समाजवादी पक्षाची चूल मांडली असली तरी सपमध्ये त्यांचे अजूनही लक्षणीय वजन असल्याचे मानले जाते.
निवडणुकीपूर्वी अखिलेश आणि शिवपाल यांनी वेगवेगळ्या रथयात्रा काढल्या होत्या. अखेरीस ते एकत्र आले होते. निकालानंतर मात्र त्यांच्यातील मतभेद उफाळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्च रोजी शिवपाल हे अखिलेश यांना भेटले. सपमध्ये आपल्याला आणखी मोठी भूमिका मिळावी अशी मागणी त्यांनी केली, मात्र तुम्ही सपचे सदस्य नसून केवळ मित्रपक्ष आहात असे अखिलेश यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर अखिलेश यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी शिवपाल यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे दुरावा पुन्हा स्पष्ट झाला. याबद्दल अखिलेश यांच्याकडे शिवपाल यांनी विचारणा केली, त्यावेळी सपच्या मित्रपक्षांची वेगळी बैठक लवकरच बोलाविण्यात येईल, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.या पार्श्वभूमीवर शिवपाल हे योगींना भेटले. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी सुमारे अर्ध्या तासाच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे स्पष्ट आहे.
या निवडणुकीत अखिलेश यांनी योगी यांचे एकमेव विरोधक म्हणून आपले स्थान बरेच भक्कम केले. अशावेळी २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्यादृष्टिने हालचाली करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिपवाल भाजपमध्ये आले तर आपल्याबरोबर सपचे किमान पाच आमदार आणतील असे सांगितले जाते. तसे झाल्यास अखिलेश यांना धक्का बसेल.
Web Title: Discussion Yogi Adityanath Shivpal Meeting Kaka Putanya Akhilesh Yadav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..