देशांतर्गत विमानसेवाही बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 मार्च 2020

आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत सर्व विमानसेवांच्या उड्डाणावर बंदीचे आदेश सरकारने दिले आहेत. अर्थात, मालवाहू विमानांच्या उड्डाणांना या बंदीतून वगळण्यात येणार आहे.

नवी दिल्ली -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये आणि परिस्थिती बिघडू नये, यासाठी "लॉकडाऊन'च्या कठोरपणे अंमलबजावणीसाठी सरकार आक्रमक झाले असून, राज्यांना सक्तीने निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, असेही केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंतर्गत आज देशांतर्गत विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. 

आजपर्यंत देशभरात 433 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, विलगीकरणात असलेल्या 23 रुग्णांची मुक्तता करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचे संकट आणखी गंभीर होण्याआधीच सक्तीने उपाययोजना सरकारने आरंभल्या आहेत. 

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आज सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले असून, कोरोनामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर 24 तास बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश दिले. आवश्‍यकता भासल्यास आणखी प्रतिबंध घालावेत आणि कठोरपणे स्थिती हाताळावी. सरकारच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचीही तयारी राज्यांनी ठेवावी, अशा सूचना मंत्रिमंडळ सचिवांनी दिल्या. याच उपाययोजनेचा भाग म्हणून आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत सर्व विमानसेवांच्या उड्डाणावर बंदीचे आदेश सरकारने दिले आहेत. अर्थात, मालवाहू विमानांच्या उड्डाणांना या बंदीतून वगळण्यात येणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जनतेमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांना सहकार्याचे आवाहन करताना वृत्तवाहिन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. 

वेतनावर परिणाम नको 
गर्दीमुळे होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील सरकारी तसेच खासगी कार्यालये, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही निर्बंध आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मर्यादित वाहतूक साधने आणि लॉकडाऊनमुळे आपसूकच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम होणार असला, तरी या सुटीमुळे कर्मचारी, कष्टकऱ्यांना मिळणाऱ्या वेतनावर परिणाम होऊ नये, कामावरील गैरहजेरीमुळे वेतन कापले जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे आदेश जारी केले आहेत. श्रम सचिव हिरालाल सामरिया यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश जारी केले. यासोबतच कोरोनाच्या संचारबंदीमुळे निवृत्तिवेतनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना निवृत्तिवेतन वेळेवर जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना गाऊन, एन-95 मास्क, 2 प्लाय, 3 प्लाय सर्जिक मास्क. यासारखे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने उद्योग क्षेत्राला आवाहन करतानाच आयत्या वेळी होणाऱ्या पुरवठ्यात अडचण येऊ नये म्हणून नियम व अटी-शर्तींमध्येदेखील सवलत देण्यात आली आहे. 

बारा खासगी प्रयोगशाळांचे साह्य 
कोरोनाच्या चाचण्यांसाठी 12 खासगी प्रयोगशाळांचे साह्य घेण्यासही सरकारने आज मंजुरी दिली आहे. या बारा प्रयोगशाळांची देशभरात 15 हजार संकलन केंद्रे असल्याने संभाव्य रुग्णांचे नमुने घेऊन संक्रमणाच्या चाचणीचा निष्कर्ष तत्काळ कळविणे सुलभ होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. यात आणखी प्रयोगशाळादेखील जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर, कोरोना चाचणी संचाच्या उत्पादनासाठी दोन उत्पादकांनाही मंजुरी दिली आहे. 

- देशांतर्गत विमान वाहतूक बंद 
- अरुणाचल प्रदेश, पंजाबमध्ये संचारबंदी जाहीर 
- तेलंगणमध्ये लॉकडाऊन जाहीर 
- तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना विशेष पॅरोल देणार 
- मध्य प्रदेशातील ३५ जिल्हे लॉकडाऊन 
- गोव्याच्या सीमा बंद 
- ओडिशात सर्व न्यायालयांचे कामकाज दिवसातून एकच तास चालणार 
- केरळमध्ये रुग्णसंख्या एकाच दिवसात २९ ने वाढली, एकूण संख्या ९२ 
- चीनकडून मदतीची तयारी, महत्त्वाची माहिती पुरविणार 

राज्यात.... 
- मिरज भाजी मंडईत लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांचा लाठीमार 
- पुण्याहून सांगलीकडे जाणाऱ्या गाड्या परत पाठविल्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Domestic airline service stopped