esakal | नमस्ते ट्रम्प : गुजरातमध्ये जंगी स्वागत, ‘मोटेरा’त भव्यदिव्य कार्यक्रम 

बोलून बातमी शोधा

Donald Trump

ट्रम्प बनले बाहुबली 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बाहुबली थीमवर तयार करण्यात आलेला व्हिडिओ रिट्विट केला. यामध्ये ट्रम्प यांना अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ ८१ सेकंदांचा असून, यामध्ये ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि त्यांचे पुत्र ज्युनिअर ट्रम्प यांनाही दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ रिट्विट करताना ट्रम्प यांनी भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 

नमस्ते ट्रम्प : गुजरातमध्ये जंगी स्वागत, ‘मोटेरा’त भव्यदिव्य कार्यक्रम 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राजधानी दिल्लीप्रमाणेच मोदींचे होमग्राऊंड असणारे गुजरातदेखील या महासत्ताधीशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह अमेरिकी प्रशासनातील अनेक बडे अधिकारी असतील. 

ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित असून, अर्थकारणाच्यादृष्टीने कळीचा विषय असणारा आयातशुल्काचा मुद्दा मात्र तसा अधांतरी राहू शकतो. ट्रम्प हे तब्बल ३६ तास भारतामध्ये असतील. मोदी आणि ट्रम्प यांच्यात मंगळवारी चर्चा होणार असून, यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण- सुरक्षितता, दहशतवादविरोधी रणनीती, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा तालिबान्यांसोबतचा प्रस्तावित शांती करार आणि आशिया प्रशांतमधील स्थिती आदी मुद्दे केंद्रस्थानी असतील. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारत सज्ज झाला असून, उद्या ते येथे आमच्यासोबत असतील ही बाब खरोरच आमच्यासाठी सन्मानजनक आहे. अहमदाबादेतील ऐतिहासिक कार्यक्रमातून या स्वागत समारंभाला प्रारंभ होतो आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

ट्रम्प यांच्या शिष्टमंडळात 
अर्थमंत्री स्टीव्हन न्यूचीन, वाणिज्यमंत्री विल्बर रॉस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि ऊर्जामंत्री डॅन ब्राऊलाईट 

साबरमती आश्रमात तयारी पूर्ण 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील साबरमती आश्रमात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या या आश्रमभेटीबाबत अनिश्‍चितता असली तरीसुद्धा आश्रमाच्या व्यवस्थापनाने मात्र तयारीला वेग दिला आहे. या आश्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआऊटदेखील लावण्यात आले असून जिथे महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचे वास्तव्य होते त्या घराचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

अहमदाबाददेखील सज्ज 
अहमदाबाद शहरामध्ये मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो होणार असल्याने त्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील स्टेडियममध्येच नमस्ते ट्रम्प या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे दोघेही सहभागी होतील. रोड शोच्या मार्गावर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक लाख लोक उभे असतील असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संस्कृतीचे दर्शन घडणार 
या रोड शोमध्ये हॅलो अहमदाबाद हा खास कार्यक्रम असेल त्या माध्यमातून पाहुण्यांना भारतीय संस्कृती आणि वैविध्याचे विशेष दर्शन घडेल. देशभरातील सर्वच राज्यांच्या कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगळे स्टेज असेल. रोड शो आटोपल्यानंतर हे दोघेही मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त संबोधनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून कैलाश खेर आणि अन्य कलाकार व गायक सादरीकरण करतील. 

वाऱ्यामुळे प्रवेशद्वार कोसळले 
गुजरातमधील मोटेरा स्टेडियममध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेले व्हीव्हीआयपी एंट्री गेट आज कोसळल्याने खळबळ निर्माण झाली. जोराच्या वाऱ्यामुळे आज सकाळी हे गेट कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

ट्रम्प बनले बाहुबली 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बाहुबली थीमवर तयार करण्यात आलेला व्हिडिओ रिट्विट केला. यामध्ये ट्रम्प यांना अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ ८१ सेकंदांचा असून, यामध्ये ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि त्यांचे पुत्र ज्युनिअर ट्रम्प यांनाही दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ रिट्विट करताना ट्रम्प यांनी भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.