esakal | आंदोलकांवर लसीची सक्ती नको; भारतीय किसान युनियनच्या नेत्याचा इशारा

बोलून बातमी शोधा

gurnam singh chaduni
आंदोलकांवर लसीची सक्ती नको; भारतीय किसान युनियनच्या नेत्याचा इशारा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

सोनीपत - आंदोलक शेतकऱ्यांवर कोरोना चाचणी किंवा लसीकरणासाठी कोणतीही सक्ती केली जाऊ नये. तसे केल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश आंदोलनस्थळी येऊ दिले जाणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते गुरनामसिंग चढूनी यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी हरियानाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी दिल्लीच्या सीमेवर धरणे धरलेल्या शेतकऱ्यांची चाचणी करून त्यांना लस देण्याची घोषणा केली होती. सोनीपतसह गुरगाव आणि फरिदाबाद येथे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सिंघू आणि टिक्री येथे शेकडो शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. काल संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर चढूनी म्हणाले की, चाचणी किंवा लसीबाबतचा निर्णय शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार व्हायला हवा. त्यासाठी सक्ती केली जाऊ नये. आजारी असल्यासारखे वाटले तरच तो शेतकरी चाचणी करून घेईल.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरसाठीची वणवण थांबणार; उत्पादन दुपट्टीने वाढले

‘ऑपरेशन शक्ती’ला छेद

कोरोनाच्या नावाखाली आंदोलन मोडून काढण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप दोनच दिवसांपूर्वी संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी केला होता, मात्र या ऑपरेशन क्लिनला शेतकरी कोरोना निर्बंधांचे पालन करीत ऑपरेशन शक्तीने प्रत्यूत्तर देतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी सुद्धा यास छेद देणारे वक्तव्य केले. शेतकरी झोपडपट्टी, बाजार, कुंभमेळा किंवा निवडणूक सभा अशा कुठेही नसून मोकळ्या हवेत बसले आहेत. लक्षणे दिसली तरच चाचणी केली जाईल. आजारी शेतकऱ्याला घरी पाठवून उपचार दिले जातील. लसीचा निर्णय शेतकऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल, असे त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचे निधन झाल्याचे, मात्र कुणाच्याही शवविच्छेदन अहवालात संसर्गाचा उल्लेख नसल्याचा दावाही त्यांनी केला.