esakal | रेमडेसिव्हीरसाठीची वणवण थांबणार; उत्पादन दुपट्टीने वाढले

बोलून बातमी शोधा

remdesivir
रेमडेसिव्हीरसाठीची वणवण थांबणार; उत्पादन दुपट्टीने वाढले
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर काही प्रमाणात उपचारांमध्ये कामाला येणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाची कमतरता जाणवू लागली होती. या रेमडेसिव्हिरसाठी कोरोना रुग्णाचे नातेवाईक औषध दुकानासमोर रांगा लावत असल्याचे दिसून आले होते. शिवाय या औषधाचा काळाबाजरही सुरु झाला होता. रेमडेसिव्हीर 30 ते 40 हजार रुपयांना विकले जात असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यात आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील रेमडेसिव्हीर औषधांची निर्मिती दुपट्टीने वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय

मनसुख मंडाविया यांनी ट्विट करुन सांगितलं की, ''देशातील रेमडेसिव्हीर औषधाची निर्मिती क्षमता महिन्याला 90 लाखांपेक्षा जास्तीची झाली आहे. यापूर्वी देशात महिन्याला 40 लाख रेमडेसिव्हिर औषधांची निर्मिती केली जात होती. लवकरच देशात दरदिवशी 3 लाख रेमडेसिव्हिर वायल्स निर्मिती होतील.'' मंडाविया यांच्या घोषणेमुळे कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, रेमडेसिव्हिर औषधांसाठी त्यांची वणवण थांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. या इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकारणही सुरु आहे. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर प्रभावी ठरताना दिसत असल्याने या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागतेय. रेमडेसिव्हीरचा वापर करण्यासंदर्भात काही गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. पण सध्या सर्रास या इंजेक्शनचा वापर सुरु असल्याने तुटवडयाची स्थिती निर्माण झालीय.