
Tamil nadu : घाबरू नका, तामिळनाडूचे लोक फ्रेंडली ; राज्यपाल आर. एन. रवी यांचं आवाहन
नवी दिल्ली - तामिळनाडूतील स्थलांतरित मजुरांवर झालेल्या हल्ल्यांच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांची भीती दूर करण्याचा प्रयत्न तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केला आहे.
उत्तर भारतीय कामगारांनी तामिळनाडूत घाबरून जाऊ नये किंवा असुरक्षित वाटू देऊ नये, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे. राज्यपालांनी म्हटले आहे की, तामिळनाडूचे लोक खूप चांगले आणि फ्रेंडली आहेत. राज्य सरकार त्यांना (स्थलांतरित कामगारांना) सुरक्षा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आश्वासन दिले होते की राज्यातील सर्व स्थलांतरित मजूर सुरक्षित आहेत. दरम्यान अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच भाजपच्या एका नेत्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एआयएडीएमकेचे नेते ओ. पन्नीर सेल्वम म्हणाले की, स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेची खात्री करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. राज्यातील तरुणांना तामिळनाडूतील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही ते म्हणाले.