सरकारी दौऱ्यांमध्ये हॉटेलांत थांबू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath
सरकारी दौऱ्यांमध्ये हॉटेलांत थांबू नका

सरकारी दौऱ्यांमध्ये हॉटेलांत थांबू नका

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आज सक्त ताकीद देताना सरकारी दौऱ्यांदरम्यान महागड्या हॉटेलांमध्ये न थांबता सरकारी अतिथिगृहांमध्ये उतरण्याची सूचना केली आहे. याशिवाय स्वतःच्या निकटवर्तीयांना स्वीय सहाय्यक म्हणून नेमू नका अशा सूचनाही योगींकडून देण्यात आल्या आहेत. हे नियम मंत्र्यांप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना देखील लागू असतील. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल वेळेवर सादर करावा तसेच जेवणासाठीचा वेळ तीस मिनिटांपेक्षा अधिक असता कामा नये असे बजावण्यात आले आहे.

साधारणपणे सरकारी कार्यालयांमध्ये दुपारी दीड ते दोनदरम्यान लंच ब्रेक असतो पण काही मंडळी हा ब्रेक संपल्यानंतर देखील विलंबाने कार्यालयामध्ये येत असल्याचे दिसून आले आहे. आताही प्रत्येकाने तीस मिनिटांमध्येच जेवण आटोपावे असे निर्देश देण्यात आल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. या सूचनांचे तातडीने पालन करण्यास देखील सांगण्यात आले आहे. कार्यालयामध्ये विलंबाने येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही या ताज्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे.

कामात कुचराई नको

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयांची पाहणी करावी. कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. सगळ्या कार्यालयांमध्ये नागरी सनदेचे काटेकोर पालन होणे गरजेचे असून कोणतीही फाइल तीन दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहता कामा नये, तसे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशी स्पष्ट ताकीदच योगींकडून देण्यात आली आहे.

Web Title: Dont Stay Hotels Government Tour Instructions Yogi Adityanath Ministers And Officials

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..