ईव्हीएमवर शंका म्हणजे मतदारांचा अपमान : पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

'ईव्हीएम'वरही संशय घेणे म्हणजे 40-45 अंश तापमानात उन्हातान्हात रांगा लावून आपला हक्क बजाविणाऱ्या देशाच्या कोट्यवधी मतदारांचा अपमान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. 
वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व विरोधकांनी आपल्या सरकारला वारंवार खिंडीत पकडल्याची खंत बोलून दाखविताना पंतप्रधानांनी, सलग दुसऱ्यांदा पराभव झाला म्हणून आपणच आणलेल्या "ईव्हीएम'वरही संशय घेणे म्हणजे 40-45 अंश तापमानात उन्हातान्हात रांगा लावून आपला हक्क बजाविणाऱ्या देशाच्या कोट्यवधी मतदारांचा अपमान असल्याचे प्रतिपादन केले.

जमावाच्या मारहाणीत झालेल्या झारखंडमधील तरुणाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना, एका घटनेमुळे साऱ्या राज्याला बदनाम करणे तुम्हाला शोभत नाही, असा हल्लाबोल कॉंग्रेसवर केला. सरदार सरोवर धरणाच्या रम्य परिसरात तुमच्या कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घ्या, असा चिमटाही त्यांनी काढला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

राज्यसभेत पाच वर्षे आम्ही खूप सोसले. पण, येथे सरकारची जी अडवाअडवी केली, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जनतेनेच तुम्हाला त्याची शिक्षा दिल्याचे मोदी कॉंग्रेसकडे पाहत कडाडले. एकेकाळी डॉ. आंबेडकरांना भंडाऱ्यातून पराभूत करण्यापासून शीख दंगलींपर्यंतच्या घटनांची कुंडली मांडत मोदींनी कॉंग्रेसवर एकामागोमाग प्रहार केले. संघराज्य रचनेत राज्यभाही येते. केवळ सरकारचे बहुमत नसल्याने एकामागोमाग एक विधेयके अडवून धरणे, हे योग्य ठरते का, असे मोदींनी विचारले. 

वायनाडमध्ये देश हरला का? 
"विदेशात जायचे आहे, कृपया दुपारी दोन वाजता बोलू द्या,' अशी मलादेखील या सभागृहात हातपाय जोडून विनवणी करावी लागते; इतका तुमचा अहंकार आहे का, असे मोदींनी संतप्तपणे विचारताच कॉंग्रेसच्या बाकांवर "हे आम्ही कधी म्हणालो?' अशी प्रश्‍नचिन्हांकित अस्वस्थता पसरली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, तुम्ही जिंकला असाल तरी देश हरला, असे म्हटले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मोदींनी, वायनाडमध्ये देश हरला का? रायबरेली, तिरुअनंतपूरम, बहारनपूरमध्ये देश हरला का, अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. 

मतदारांचा मान राखला नाही 
देवाने सारी बुद्धी आपल्यालाच दिली, अशी भावना राज्यसभेच्या सदस्यांमध्ये आढळते, असा चिमटा काढून मोदी म्हणाले, "दोन हजारांची मदत केलेला शेतकरी विकाऊ आहे काय? प्रसारमाध्यमे विकाऊ आहेत काय? माध्यमांमुळे आमचा विजय झाला, ही कसली वृत्ती आहे? दहा लाख मतदान केंद्रे, 8000 उमेदवार, 40 लाख ईव्हीएम इतकी अवाढव्य यंत्रणा यशस्वीपणे राबविणाऱ्या साऱ्या यंत्रणेला केवळ एका पराभवाबद्दल व व्यक्तिगत राजकारणासाठी सरसकट दोषी कसे ठरविता? तुमची स्वप्ने भंगली म्हणून तुम्ही मतदारांचाही मान राखत नाही.

ईव्हीएम पहिल्यांदा 1977 मध्ये आले. 1982 मध्ये त्याचा प्रथम उपयोग झाला. 1988 मध्ये याच सभागृहाने प्रथम कायदा बनविला. 1992 मध्ये त्याचे नियम बनविले. या साऱ्या काळात कॉंग्रेस पक्षच सत्तेवर होता व आम्ही (भाजप) तर सत्तेच्या आसपासही नव्हतो. तेव्हा तुम्हीच आम्हाला 2 या 3 बस, असे हिणवत होतात. ज्या ईव्हीएमद्वारे 113 विधानसभा व 4 लोकसभा निवडणुका तुम्ही जिंकलात; हरल्यावर लगेच तुम्ही गळे काढून रडारड सुरू केलीत.'' 2017 मध्ये आयोगाने ईव्हीएममधील दोष दाखविण्याचे आवाहन केले तेव्हा कॉंग्रेस पक्ष तेथे गेलाही नव्हता. फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाकप आपल्या शंकानिरसनासाठी गेले होते, याचीही आठवण त्यांनी करवून दिली. 

"एक देश एक निवडणूक' याबाबतच्या बैठकीला कॉंग्रेसने बहिष्कार टाकल्याची खंत बोलून दाखविताना मोदी म्हणाले, "निवडणुकीच्या सततच्या चक्रातून सुटका करण्यासाठी या कल्पनेवर चर्चा तरी सुरू झाली पाहिजे.'' 

"पाणी वाचवा' हा मुख्य अजेंडा 
"पुढच्या पाच वर्षांत देशवासीयांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेचे आव्हान माझ्या सरकारला पूर्ण करायचे आहे,'' असे मोदी म्हणाले. आता जलसंचय म्हणजेच पावसाचा थेंब अन्‌ थेंब वाचविण्याची लोकचळवळ उभी करण्यावर सरकार भर देईल. देशातील अतिदुष्काळी 226 जिल्ह्यांची यादी सरकारने केली असून, त्यांना सर्वप्रथम दुष्काळमुक्त करण्यासाठी जनजागृतीची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मोदी म्हणाले... 
- जनधन, योग दिन व स्वतःच आणलेले आधार यांची खिल्ली उडविण्याच्या नकारात्मकतेतून कॉंग्रेसने बाहेर पडावे. 
- ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, जीएसटी यांना विरोध करणाऱ्यांना जनतेने शिक्षा दिली आहे. 
- सारे श्रेय तुम्हालाच हवे, तर एनआरसीचेही श्रेय तुम्ही घ्या. ते तर राजीव गांधींनीच आणले होते. आमच्यासाठी एनआरसी मतपेढी नसल्याने आम्ही ते लागू करणारच. 
- आयुष्मान भारतवर टीका करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मकतेने पाहा. 
- दिल्लीत शिखांचे शिरकाण करणाऱ्यांनी आम्हाला उपदेश करू नये. त्यातील आरोपींना तुम्ही (मुख्यमंत्र्यांसारख्या) घटनात्मक पदांवर बसविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubt about EVM is disrespect to voters says PM Modi