Teacher's Day 2019 : नगरच्या शिक्षकाला यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 5 September 2019

नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिक्षकदिन 2019
नवी दिल्ली- 
नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अनाथ मुलांचा सांभाळ करणारा, दुष्काळी गावांना पाणीवाटप करून आपला वाढदिवस साजरा करणारा, कवीमनाचा व बासरी वादनातही पारंगत असा हा युवा शिक्षक 2018 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी राज्यातून पात्र ठरलेला एकमेव शिक्षक ठरला आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त देशभरातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. वर्ष 2018 साठी महाराष्ट्रातून या पुरस्काराकरिता अहमदनगर येथील श्री. समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. बागूल यांची निवड झाली आहे. रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

एकाच शैक्षणिक वर्षात राबविले 276 शैक्षणिक उपक्रम 
डॉ. अमोल बागुल हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी एकाच शैक्षणिक वर्षात 276 शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया केली आहे. कवीमनाच्या या शिक्षकाने जागतिक मराठी भाषादिनी अभ्यासक्रमातील कवितांचे 77 सार्वजनिक ठिकाणी गायन केले. त्यांनी बासरी वादनातही आपला ठसा उमटविणा-या डॉ. बागुल यांनी 7 हजार 500 विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत शिकविले आहे.

वर्ल्ड टिचर फोरमच्या मध्ये सक्रीय असलेले डॉ. बागुल यांनी या माध्यमातून 121 देशातील 5 हजार शिक्षकांमध्ये होत असलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि संकल्पनांच्या आदन-प्रदानात सहभाग घेतला आहे. त्यांनी 9 पुस्तकेही लिहीली आहेत. अमेरिकेतील हनिबेल स्पेस अकॅडमी आणि नासा स्पेस कॅंपसाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी 200 हून अधिक शैक्षणिक प्रशिक्षण घेतले असून 50 हून अधिक विशेष अभ्यास कार्यक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. वर्ष 2011च्या जनगणना कार्यक्रमातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.

याशिवाय डॉ. बागुल 30 अनाथ, वंचित मुलांचा सांभाळ करीत आहेत. दुष्काळग्रस्त 22 गावांना पाणीवाटप करून आपला वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचेही व्यापक कौतुक झाले आहे. डॉ बागुल हे उत्तम व्याख्याते आहेत, रांगोळी कलेतही ते पारंगत आहेत. डॉ. बागुल यांच्या शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Bagul gets National Teacher Award