esakal | कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान

बोलून बातमी शोधा

Dry Swab

कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना झाला की नाही, याची खात्री करायची, तर आरटी-पीसीआर टेस्ट करायला लागते. त्या चाचणीचे निष्कर्ष समजायला किमान २४ तास लागतात. याचा खर्चही पाचशे ते दीड हजारांपर्यंत येतो. मात्र, हा वेळ आणि खर्च अर्ध्यावर आणणारे ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. सध्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी नाकात किंवा घशातील ‘स्वॅब’ घेऊन तो रसायनिक द्रव असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे पाहण्यासाठी ‘स्वॅब’मधील विविध कणांमधील ‘आरएनएन’ वेगळा करण्याची (एक्सट्रॅक्शन) प्रक्रिया असते. त्यानंतरच्या चाचणीत हा ‘आरएनए’ कशाचा आहे, हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला की नाही, याचे निदान होते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असली, तर चार तासांचा अवधी लागतो.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) हैदराबाद येथील संस्थेने (सीसीएमबी) नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात ‘आरएनए एक्सट्रॅक्शन’ ही महत्त्वाची प्रक्रिया न करतानही ‘ड्राय स्वॅब’द्वारे संबंधित व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही, याचा निष्कर्ष काढता येणार आहे. यासंस्थेत अशा प्रकारे ६० हजार चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात चाचणीचा अचूक निष्कर्ष मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच!

सेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी ‘सीसीएमबी’तील प्रवक्ता डॉ. सोमदत्ता कारक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की नव्या तंत्रज्ञानाला ‘आयसीएमआर’ने मान्यता दिली आहे. ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनीही या संशोधनाला दुजोरा दिला. या चाचण्यासाठी नवे किट तयार करण्याची आणि मनुष्यबळाला वेगळे प्रशिक्षण देण्याचीही गरज नाही, असे ते म्हणाले.

‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञानामुळे आरटी-पीसीआर चाचणीच्या विश्‍लेषणाचे प्रमाण तीन पटींने वाढेल. त्याची किंमत निम्म्यावर येऊ शकते. सध्या स्वॅब हा रासायनिक द्रवात टाकून त्याचे वहन करावे लागते. नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅबची हाताळणी सहज होईल, त्यासाठी खूप सुरक्षा उपायांची गरज नाही. वाहतुकीदरम्यान द्रव दूषित होण्याचा धोकाही टळेल. येत्या काही दिवसांत हे तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध होईल.

- डॉ. राकेश मिश्रा संचालक, सेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी, हैदराबाद