कर्तव्यपालन, चर्चांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्तव्यपालन, चर्चांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य
कर्तव्यपालन, चर्चांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य

कर्तव्यपालन, चर्चांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य

नवी दिल्ली : लोकांनी आपल्याला दिलेल्या कर्तव्याचे पालन, सभागृहातील चर्चांचा दर्जा उंचावणे आणि कामकाजाचा प्राधान्यक्रम, हाच मंत्र देशातील आमदार आणि खासदारांनी पुढील २५ वर्षांत जपावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

विधिमंडळे आणि संसदेतील चर्चा यामध्ये ‘भारतीयता’ हा मुख्य भाव असावा असेही पंतप्रधानांनी जोर देऊन सांगितले. देशातील विधिमंडळे आणि संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८२ व्या अखिल भारतीय वार्षिक परिषदेला पंतप्रधानांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. विधिमंडळ तसेच संसदेतील गदारोळाचा थेट उल्लेख न करता पंतप्रधानांनी याबाबतीत आपले मत काय आहे, हे पुन्हा सूचित केले.

विधिमंडळे असोत की संसद, तेथील चर्चांचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा आणि यावेळी संसदीय संकेत आणि सभ्यतेचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की, भारतासाठी पुढील २५ वर्षे (स्वातंत्र्याचा शतक महोत्सव) अतिशय महत्त्वाची आहेत. या काळात लोकसेवक आणि विधिमंडळे तसेच संसदेने जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित आहे.

लोकप्रतिनिधीगृहांमधील गदारोळाच्या संदर्भात पंतप्रधानांनी सभागृहामधील गुणवत्तेवरही जोर दिला. ते म्हणाले की, आमच्या सभागृहांची परंपरा आणि व्यवस्था यांची मूळ प्रकृती भारतीय असायला हवी. आमची धोरणे आणि कायदे यांच्यामध्येही हेच भारतीयत्व उठून दिसायला पाहिजे. किंबहुना तसे अपेक्षित आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, एक भारत श्रेष्ठ भारत हा आमचा संकल्प व्हायला हवा. सभागृहातील आमचे आचरण हे देखील भारतीय मूल्यांचे दर्शन घडवणारे अपेक्षित आहे असेही पंतप्रधानांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर नमूद केले.

"कर्तव्य,कर्तव्य आणि कर्तव्य हा एकच मंत्र आपल्यासमोर हवा. कर्तव्य ही आमची जीवनशैली व्हायला हवी. हे कर्तव्य कोणते तर कायदे करणे ही जी जबाबदारी जनतेने आमच्यावर दिली आहे, ती गांभीर्याने पार पाडणे. आम्ही आमच्या विहित कर्तव्याच्या मार्गावरून चाललो तर यामुळे नागरिकांवरही प्रभाव पडेल."

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

loading image
go to top