
नवी दिल्ली, ता. ११ : दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फिरकी घेत शरद पवारांची फिरकी घेत मिश्किल टिप्पणी केली. शरद पवार यांनी शिंदेंच्या सत्कारावेळी बोलताना म्हटलं की, ‘‘नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येते. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले, त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल."