esakal | फळे धुवून न खाणे धोकादायक; निपाहच्या संसर्गाबाबत एम्सच्या डॉक्टरांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

फळे धुवून न खाणे धोकादायक; निपाहच्या संसर्गाबाबत एम्सच्या डॉक्टरांचा इशारा

फळे धुवून न खाणे धोकादायक; निपाहच्या संसर्गाबाबत एम्सच्या डॉक्टरांचा इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका टळलेला नसताना केरळमध्ये निपाहने चिंता वाढवली आहे. केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षाच्या मुलाचा निपाहने मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या २५१ जणांची ओळख पटली आहे. यातील ३८ जण कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात आयसोलेट असून ११ लोकांमध्ये निपाहची लक्षणे आढळली आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आशुतोष बिस्वास यांनी सांगितलं की, वटवाघुळांमुळे निपाह पसरतो. हेच संसर्गाचे मुख्य कारण आहेत. वटवाघुळ विशिष्ट अशा क्षेत्रात असतात. जर ते एका जागेहून दुसरीकडे जातात तेव्हा विषाणू पसरतो. अजुनतरी यावर कोणताही उपचार नाही. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा एक गंभीर आजार आहे आणि याचा मृत्यूदर जास्त आहे.

बिस्वास यांनी असेही सांगितले की, भारतात याआधीही वटवाघुळांकडून पाळीव प्राण्यांमध्ये विषाणूचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे या पाळीव प्राण्यांमधून मानवाला याची लागण होणे खूप धोकादायक आहे. आम्ही याला स्पिलओवर म्हणतो. एकदा याचा संसर्ग सुरु झाला तर तो एका माणसापासून दुसऱ्यामध्ये पसरायला सुरु होतो आणि याचा वेग जास्त असतो. त्यामुळे या विषाणूची ओळख पटवणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: 'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

पडलेली फळे खाणे, विशेषत ती धुवून न खाणे ही धोकादायक सवय आहे. अशा फळांमधूनच संसर्ग शरिरात पसरतो असेही बिस्वास यांनी सांगितलं. केरळ आणि बंगालमध्ये निपाहची एक लाट येऊन गेली आहे. याआधी निपाहची लागण झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ मध्ये फक्त एक रुग्ण सापडला तर २०२१ मध्ये पहिला रुग्ण सापडला आणि त्याचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचंही बिस्वास यांनी म्हटलं.

loading image
go to top