esakal | 'लोकशाहीची अवस्था खराब', 'आसाम EVM' प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi.

भाजप आमदाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने आसाममधील राताबारी जागेवरील एका पोलिंग स्टेशनवर पुन्हा एकदा मतदान घेण्याची घोषणा केली आहे.

'लोकशाहीची अवस्था खराब', 'आसाम EVM' प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुवाहाटी : आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सध्या राजकीय वातावरण गरम झालं आहे. या व्हिडिओमध्ये एक निवडणूक अधिकारी कारमधून ईव्हीएम मशिन घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, भाजप नेत्याची ही कार असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने चार जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ईव्हीएम ज्या गाडीतून नेण्यात आलं ती गाडी भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती असं समोर आलं आहे. त्यांच्या गाडीत ईव्हीएम असल्याचं समजल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचे व्हिडिओ स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केले असून त्यातलाच एक व्हिडिओ प्रियांका गांधी यांनी शेअर केला आहे. 

हेही वाचा - मतदानानंतर EVM भाजप उमेदवाराच्या कारमध्ये; 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी भाजपवर हल्लाबोला केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलंय की, निवडणुक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नैतिकता खराब, लोकशाहीची अवस्था खराब! असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचा समाचार घेतला आहे. निवडणूक आयोगाने आसाममधील राताबारी जागेवरील एका पोलिंग स्टेशनवर पुन्हा एकदा मतदान घेण्याची घोषणा केली आहे. या पोलिंग स्टेशनवरील पोलिंग टीमने भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमधून EVM ची वाहुतक केली होती. या प्रकारानंतर करीमगंजमध्ये हिंसा भडकली होती. निवडणूक आयोगाने या पोलिंग टीममधील सदस्यांना बर्खास्त केलं आहे. 

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, काय स्क्रीप्ट आहे? निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली, त्याचवेळी तिथे एक गाडी  प्रकट झाली. ही गाडी भाजपच्या उमेदवाराची निघाली. भोळा निवडणूक आयोग त्यात बसून प्रवास करत राहिला. प्रिय निवडणूक आयोग, काय भानगड आहे ही? आपण देशासमोर याबाबत काही स्पष्टीकरण देऊ शकता का? की आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम ठोकावा?

प्रियांका गांधी यांनी याआधी ट्विट करत या प्रकरणाकडे लक्ष वेधलं होतं, त्यांनी भाजपवर टीका करतान म्हटलं होतं की, असे अनेक प्रकार समोर येत आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा खासगी गाड्यांमधून ईव्हीएम घेऊन जाण्याचे प्रकार समोर येतात. या गोष्टी सामान्य आहेत. विशेष म्हणजे या गाड्या भाजप नेता किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या असतात. अशा प्रकरणात एकमेव घटना असल्याचं सांगत एक चूक मानून फेटाळून लावल्या जातात. व्हिडीओ समोर आणणाऱ्यांबाबत भाजपकडून वेगळीच माहिती पुढे सांगितली जाते. प्रत्यक्षात अशा अनेक घटना घडत असून काहीच पावलं उचलली जात नाहीत. निवडणूक आय़ोगाने कठोर पावले उचलायला हवीत. सर्व राष्ट्रीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरावर पुन्हा विचार करायला हवा. 

loading image