ईडीची मोठी कारवाई; चंदा कोचर यांच्या पतीला अटक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समुहाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. कर्ज देण्याच्या प्रक्रियेत बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्या पतीवर होता.

नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने ICICI Bank Videocon प्रकरणी आयसीआयसीआयच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. ईडीने गेल्या वर्षी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत आणि काही जणांविरुद्ध आयसीआयसीआय बँकेतून व्हिडिओकॉन समुहाला 1875 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्याच्या प्रकरणात अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या जोरावर ईडीने ही कारावाई केली होती. सीबीआयने या प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर आणि धूत यांच्या कंपन्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल लिमिटेड(व्हीआयईएल) आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या एफआय़आरमध्ये सुप्रीम एनर्जी आणि दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्यूएबल्स यांचेही नाव आहे. सुप्रीम एनर्जीची स्थापना धूत यांनी केली होती. 

आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समुहाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज प्रकऱणावरून मोठा वादही झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी न्यायाधीश श्रीकृष्ण समितीकडे सोपवण्यात आली होती. यामध्ये कर्ज देण्याची प्रक्रियेत घोटाळा असल्याचा अहवाल समितीने दिला होता. 

हे वाचा - भाजपचा आयटी सेल बदमाश; स्वामींनी दिला घरचा आहेर

समितीने अहवालात म्हटलं होतं की, कर्ज देण्याच्या प्रक्रियेत बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आलं होतं. यामध्ये हितसंबंधाचाही संमावेश होता. कारण कर्जाचा एक भाग त्यांचे पती दीपक यांच्या मालकीच्या कंपनीला देण्यात येत होता. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक लाभ मिळाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED arrests Deepak Kochar in connection with ICICI Bank Videocon case