ईडीकडून फारुख अब्दुल्ला यांची चौकशी; राजकीय हेतूने प्रभावित?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 October 2020

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे.

नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियन Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे अब्दुल्ला यांनी याला राजकीय कट असल्याचं म्हणत पक्षाला निषेध करण्यास सांगितलं आहे. 

मोदी आणि माझ्या वडिलांची मैत्री अतुलनीय- डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर

फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे. फारुख अब्दुल्ला यांची चौकशी राजकीय हेतूने प्रभावित आहे. सहा पक्षांनी मिळून जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देणारे कलम लागू व्हावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्याचमुळे सरकार खुनशीपणातून ईडीचा ससेमिरा मागे लावत असल्याचं ओमर अब्दुल्ला म्हणालेत. 

फारुख अब्दुल्ला यांच्यासह जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियनमधील दहा पदाधिकारी यांना आरोपी धरण्यात आले आहे. 2012 मध्ये हा घोटाळा समोर आला होता. JKCA चे खजीनदार मन्सूर वझीर यांनी माजी जनरल सेक्रेटरी मोहमद सलीम खान आणि माजी खजिनदार अहसान मिर्झा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या घोटाळ्याप्रकरणी 50 नावे समोर आली होती. त्यानंतर अब्दुल्ला यांनी JKCA चे अध्यक्षपद गमावले होते. अब्दुल्ला यांची याप्रकरणी याआधीही चौकशी करण्यात आली आहे. 

दरम्यान, मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. यामध्ये फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहमुबा मुफ्ती यासारख्या नेत्यांचा समावेश होता. सर्व नेत्यांची आता सुटका करण्यात आली आहे. 
जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढल्याच्या विरोधात सहा पक्षाच्या नेत्यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. यावेळी पीडीपी अध्यक्ष मेहमुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्स अध्यक्ष साजद लोन, पीपल्स मुव्हमेंटचा नेता जावेद मीर, सीपीआय(एम) नेता मोहम्मद युसूफ तारीगामी आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुझफर शहा उपस्थित होते. मेहबुबा मुफ्ती यांची केंद्र सरकारने सुटला केल्यानंतर दोन दिवसांनी ही बैठक बोलावण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ed questions National Conference chief Farooq Abdullah in JK Cricket Association scam