मोदी आणि माझ्या वडिलांची मैत्री अतुलनीय- डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 October 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असणाऱ्या संबंधाची प्रशंसा केली आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असणाऱ्या संबंधाची प्रशंसा केली आहे. माझे वडील आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध अतुलनीय आहेत. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहणे सन्मानाची गोष्ट आहे, असं डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपल्या निवडणूक प्रचारासाठी मोदींच्या भाषणांचा वापर करत आहेत. अशावेळी ट्रम्प ज्यूनियर यांचे वक्तव्य आले आहे. 

मला वाटतं की माझे वडील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध अतुलनीय आहेत. याला पाहणे सस्मानाची गोष्ट आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शानदार आणि जोरदार संबंध आहेत. भविष्यात दोन्ही देशांना याचा मोठा फायदा होईल, असं डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर म्हणालेत. अमेरिकेत जवळजवळ 20 लाख अमेरिकी-भारतीय मतदार राहतात. यांना आपल्याकडे ओढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या मैत्रीचा वापर केला आहे. त्यांनी यासंबंधी एका व्हिडिओची जाहिरात केली होती. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण आणि ट्रम्प यांच्या अहमदाबादच्या ऐतिहासिक संबोधनाची संक्षिप्त क्लिप होती. 

टि्वटरची मोठी चूक, जम्मू-काश्मीरला दाखवले चीनचा भूभाग

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इंवाका, जावाई जेरेड कुशनर आणि त्यांच्या प्रशासनाचे अधिकारी भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी ट्रम्प आणि मोदी एकमेकांचा हात-हातात धरुन चालले होते. या प्रंसगाचा व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

प्रचार अभियानाचे नेतृत्व करणारे डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर भारतीय-अमेरिकी नागरिकांसोबत चांगल्यारितीने जोडले गेले आहेत. त्यांनी जाहिरातीचा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा दाखला देत अमेरिकी-भारतीय नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. 

अलाहाबादमधील भाषणात मोदींनी केले होते कौतुक

अलाहाबादमधील सभेत 50,000 पेक्षा अधिक जनसमुदाय जमा झाला होता. यावेळी मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदी भारतीय-अमेरिकी नागरिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या अमेरिकीतील सभेत हजारोंची गर्दी जमा झाली होती. याचा फायदा ट्रम्प निवडणुकीत घेऊ पाहात आहेत. दरम्यान, 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय-अमेरिकी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump junior praises pm narendra modi