राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; महाराष्ट्रातील खासदाराचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकूण आठ खासदारांवर ही कारवाई करण्यात आली

नवी दिल्ली - कृषी विधेयकावरून राज्यसभेत काल अभूतपूर्व गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांकडून नियमावली पुस्तिका फाडण्यात आलं तसंच उपसभापतींचा माईकसुद्धा तोडण्यात आला. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकूण आठ खासदारांवर ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजु सातव, केके राजेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझिर हुसैन, इम्रान करिम यांचा समावेश आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली. 

सभाहात अभूतपूर्व गदारोळ
गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की, अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरलेले विरोधी पक्षांचे सदस्य, कागदपत्रांची फाडाफाडी व पुस्तके उपसभापतींच्या अंगावर फेकून मारणे, सामाजिक अंतरभान न पाळता अत्यंत दाटीवाटीने उभ्या असलेल्या सुमारे ६० मार्शलची सभागृहातील तैनाती, त्यांच्यासह महिला सुरक्षारक्षकांनी सभापतींच्या आसनाला केलेले कडे, काही विरोधी नेत्यांची उपसभापतींबरोबर झालेली शारीरिक झटापट, सभापतींच्या आसनासमोरील माइक तोडण्याचा प्रयत्न, सरचिटणीसांच्या टेबलावर चढून दिलेल्या घोषणा व त्या देणाऱ्या खासदारांना ८-१० मार्शलनी अक्षरशः उचलून खाली उतरविणे असा अभूतपूर्व गदारोळ सभागृहात झाला.

सुरक्षारक्षकांचे कडे
‘मोदी शरम करो’, ‘किसानविरोधी मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या सर्वांत दुपारी सव्वा वाजता सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होण्याआधी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यसभा सुरक्षा अधीक्षकांना बोलावून उपसभापती व महासचिवांच्या टेबलाभोवती मार्शलचे कडे करण्याची सूचना केली. त्यानंतर लॉबी, सभागृहाचे आवार आदींमध्ये तैनात असलेल्या ७ महिला सुरक्षारक्षकांसह सुमारे ५५ ते ६० मार्शल सभागृहात आले. त्यांनी सभापतींच्या आसनाभोवती संपूर्ण कडे केले. महिला सुरक्षारक्षकांना पुढे उभे करण्यात आले. 

हे वाचा - मध्यरात्रीपर्यंत चाललं लोकसभेचं कामकाज, 4 विधेयकांना मंजुरी

हरिवंश यांच्याविरुद्ध ‘अविश्‍वास’ नाही
दरम्यान राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह ऊर्फ हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली केल्या. मात्र हा अविश्वास ठराव सभापतींनी फेटाळून लावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight members of the House are suspended for a week