esakal | "एकदा माझ्याशी बोल, बाबू.."; प्रियकराचं लग्न सुरू असताना हॉलबाहेर तरुणीचा गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

"एकदा माझ्याशी बोल, बाबू.."; प्रियकराचं लग्न सुरू असताना हॉलबाहेर तरुणीचा गोंधळ

"एकदा माझ्याशी बोल, बाबू.."; प्रियकराचं लग्न सुरू असताना हॉलबाहेर तरुणीचा गोंधळ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. एका क्लिकवर क्षणार्धात एखादा फोटो किंवा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरतो आणि त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियासुद्धा येऊ लागतात. मध्यप्रदेशमधल्या एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडचं लग्न होत असताना विवाहस्थळी गेटबाहेर ती त्याला विनंती करताना या व्हिडीओत दिसतेय. मध्यप्रदेशमधल्या होशंगाबाद इथला हा व्हिडीओ आहे. (Ek baar baat karlo babu Woman requesting outside wedding venue as lover gets married slv92)

हॉलमध्ये मुलाचं लग्न होत असताना ही तरुणी हॉलच्या गेटबाहेर उभी राहून "एकदा माझ्याशी बोल", अशी विनंती करताना दिसतेय. लग्न करण्याआधी किमान एकदा माझ्याशी बोल असं म्हणत ती 'बाबू.. बाबू' अशी आर्त हाक मारतेय. रस्त्यावरील येणा-जाणाऱ्यांपैकीच एकाने तिचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. "एकदा माझ्याशी बोल, बाबू", अशी विनंती करत ती गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला आत जाण्यापासून रोखलं जातं.

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही तरुणी कानपूरची असून तिच्या प्रियकराने इतर कोणाशीही लग्न करणार नसल्याचं आश्वासन दिल्याचा दावा ती करत आहे. ऐनवेळी प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने ती विवाहस्थळी पोहोचून लग्न रोखण्याचा प्रयत्न करत होती. जवळपास अर्धा तास ती तरुणी तिथे उभी होती आणि त्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिला तेथून जाण्याची सूचना दिली. संबंधित प्रियकर हा तिच्यासोबत तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि अचानक काहीच न सांगता त्याने गुपचूप लग्न केल्याचा आरोप तरुणीने पोलिसांकडे केला. प्रियकराविरोधात कारवाई करायची असल्यास तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला असता तरुणीने त्यास नकार दिला.

loading image