esakal | निवडणूक आयोग बरखास्त करा; काँग्रेसचा ममता यांच्या सुरात सूर

बोलून बातमी शोधा

Election Commission
निवडणूक आयोग बरखास्त करा; काँग्रेसचा ममता यांच्या सुरात सूर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळविणाऱ्या ममता बॅनर्जीं (Mamata Banerjee) यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. सध्याचा निवडणूक आयोगच (Election Commission) बरखास्त करावा अशी मागणी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) घटनापीठाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नियुक्ती पात्रतेचे निकष ठरवावे, अशी सूचनाही केली आहे.चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता यांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. निवडणूक प्रचारातही आयोगाचे काही निर्णय राजकीय आरोप प्रत्यारोपांस कारणीभूत ठरले होते.

हेही वाचा: निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं ५० चा आकडाही गाठला नसता - ममता बॅनर्जी

विशेष म्हणजे केरळ (Kerala) आणि आसाम (Assam) या राज्यांमध्ये काँग्रेसच्या पदरात यश पडलेले नाही. बंगालमध्ये तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. असे असताना शर्मा यांनी ममता यांच्या सुरात सूर मिसळला. शर्मा म्हणाले, की आयोगावरील सदस्यांच्या वर्तनाची चौकशी होणे आवश्यक आहे. आयोगाने मतदारांचा विश्वासघात करून स्वतःला बदनाम केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीबाबत, आयोगातील सदस्यांची संख्या आणि पात्रतेचे निकष काय असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल द्यावा. आयोगाने निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे काम करावे यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे देखील न्यायालयाने ठरवावी.

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन

शर्मा यांनी ट्विटद्वारे आयोगावर तोफ डागली. ते म्हणाले की, घटनेच्या ३२४व्या कलमांतर्गत मिळालेल्या अधिकारांचे आयोगाने उल्लंघन केले. बंगालमध्ये आयोगाचे पक्षपाती वर्तन निषेधार्ह आहे. अनेकदा निवडणूक आयोग भाजपचा सहकारीच असल्याचे दिसून आले. कोणत्याही निर्बंधांशिवाय मोठ्या सभांना परवानगी देणारा आयोग कोविड नियमावलीच्या उल्लंघनासाठी दोषी आहे.

Election Commission should be disbanded says Anand Sharma