
'इलेक्ट्रिक वाहनांची किंमत दोन वर्षांत पेट्रोल वाहनांइतकीच होईल'
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, यातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी देशातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती पेट्रोल वाहनांच्या किमती इतक्याच होतील असे सांगितले. "मी सर्व सन्माननीय सदस्यांना खात्री देईन की दोन वर्षांत इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक तीनचाकी आणि इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या किमतीएवढी होईल आणि देश बदलेल," असे ते म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संसदेच्या आवारात चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करताना गडकरी म्हणाले की, चार्जिंग स्टेशन इंस्टॉल झाल्यानंतर खासदार ईव्ही खरेदी करू शकतात. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या परिसरात आम्ही पार्किंग व्यवस्थेत इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा देण्याच्या विचारात आहोत असे देखील ते पुढे म्हणाले.
केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे. दरम्यान, नितीन गडकरी बुधवारी त्यांच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या टोयोटा मिराय या कारमधून संसदेत पोहोचले आणि हायड्रोजन हे इंधनाचे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. ही कार जपानच्या टोयोटा कंपनीची असून हायड्रोजन इंधन फरीदाबाद येथील इंडियन ऑइल पंपाचे आहे.
हेही वाचा: अविवाहित मुलगी पालकांकडून लग्नाचा खर्च मागू शकते - छत्तीसगढ हायकोर्ट
'आत्मनिर्भर' होण्यासाठी, आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन आणला आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होणार आहे. आयातीवर अंकुश ठेवला जाईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
लोकांना “भविष्यातील इंधन” वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ते लवकरच दिल्लीच्या रस्त्यावर हायड्रोजन-इंधन असलेल्या कारमध्ये दिसतील असे गडकरी यांनी जानेवारीमध्ये सांगितले होते. दरम्यान बुधवारी संसदेत, गडकरींनी पर्यायी इंधनाविषयी माहिती दिली ते म्हणाले की, “पर्यायी इंधनामुळे राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीचे हे रसायन विकसित करत आहोत. जर पेट्रोलवर तुम्ही 100 रुपये खर्च करत असाल, तर इलेक्ट्रिक वाहनावर तुम्ही 10 रपये खर्च कराल," असे नितीन गडकरी पुढे म्हणाले.
हेही वाचा: महागाईच्या प्रश्नावर भडकले रामदेव बाबा; म्हणाले, "चुप हो जा, आगे पुछेगा तो…"
Web Title: Electric Vehicles To Cost Same As Petrol Vehicles In 2 Years Says Nitin Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..