
Twitter : ट्विटर १५० कोटी खाती हटविणार
नवी दिल्ली : ट्विटर ताब्यात घेतल्यापासून चित्रविचित्र निर्णयांमुळे चर्चेत असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटरवरून तब्बल १५० कोटी ट्विटर खाती कायमची हटवण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून या प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेली सुमारे १५० कोटी खाती लवकरच डिलीट केली जातील, असे ट्विट मस्क यांनी आज केले आहे. सध्या ट्विटर प्लॅटफॉर्मवर अशी अनेक खाती आहेत जी तयार केल्यानंतर वापरलीच गेली नाहीत. अनेक खात्यांवर ती सुरू केल्यानंतर एकदाच लॉग इन करण्यात आले आहे.
तर अनेक खात्यांमध्ये अनेक वर्षे लॉग इन केलेले नाही की कोणतेही ट्विट केलेले नाही. खाते तयार केल्यानंतर पासवर्ड विसरल्याने अनेक वापरकर्त्यांनी नवे खाते तयार केले आहे. त्यामुळे जुनी खाती तशीच निष्क्रीय स्थितीत आहेत. अशी खाती हटवून ट्विटरवर अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे मस्क यांनी म्हटले आहे. अलिकडेच मस्क यांनी ट्विटर खात्याची अद्ययावत स्थिती दर्शवणारे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात असल्याचे सांगितले होते. यामुळे खोट्या नावाने चालवले जाणाऱ्या बोगस खात्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशी खाती हटवणे सोपे होणार आहे, असेही मस्क यांनी म्हटले आहे.