
Jammu Kashmir Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या कारवाईमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पोशक्री भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराबंदी करून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी दहशवाद्यांनी गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित
दरम्यान, कारवाईत मारले गेलेले दहशतवाद्यांची ओळख दानिश भट उर्फ कोकाब दुरी आणि बशारत नबी अशी करण्यात आली असून, हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. हे दोघेही 9 एप्रिल 2021 रोजी सलीम या टीए कर्मचारी आणि 29 मे 2021 रोजी दोन नागरिकांच्या हत्येमध्ये सामील होते. याआधी सोमवारी दहशतवाद्यांनी अनंतनागच्या इमामसाहेब भागात एसओजी कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एसओजी कॅम्पला लक्ष्य करत गोळीबार केला. जवानांच्या प्रत्युत्तरानंतर दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही.