निकाल उद्या लागणार; त्यापूर्वीच तापला ईव्हीएमचा मुद्दा!

निकाल उद्या लागणार; त्यापूर्वीच तापला ईव्हीएमचा मुद्दा!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास जेमतेम काही तास उरले असताना कॉंग्रेस व डाव्या आघाडीसह 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानीतील कॉस्टिट्यूशन क्‍लबमध्ये सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षांनी तापविला असून, निवडणूक आयोगाला निवेदन देऊन 23 मेच्या मतमोजणीबाबत काही मागण्या केल्या. 

सत्तारूढ भाजप आघाडीने ईव्हीएमविरोधाचे वर्णन करताना "कोल्ह्याला द्राक्षे आंबट' या धर्तीची प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्य प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकीवेळी यांना अगदी निर्दोष वाटणारी ईव्हीएम लोकसभेचे एक्‍झिट पोल जाहीर होताच, एका रात्रीत भयंकर सदोष वाटू लागावीत, हा विरोधकांनी निकालाआधीच स्वीकारलेल्या पराभवाचा पुरावा असल्याचे मत भाजपने व्यक्त केले. भाजपच्या विरोधातील 22 पक्षांनी तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली कॉन्स्टिट्यूशन क्‍लबमध्ये बैठक घेऊन ईव्हीएमच्या दुरुपयोगाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्तेत पुन्हा येण्यापासून रोखण्यासाठीच्या पर्यायांवरही या वेळी चर्चा झाली. कॉंग्रेस, डावे पक्ष, तेलगू देसम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, द्रमुक, सपा, बसपा, तृणमूल कॉंग्रेस, आप आदी 22 भाजपविरोधी पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. मात्र राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी आपापले प्रतिनिधी बैठकीस पाठविले.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला बहुमत देणाऱ्या एक्‍झिट पोलला विरोधकांनी फेटाळून लावले. निकालानंतर केंद्रात बिगरभाजप सरकारच्या स्थापनेच्या विविध पैलूंबाबतही बैठकीत चर्चा झाली. निवेदनावर गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, अहमद पटेल, डेरेक ओ ब्रायन , सीताराम येचुरी, डी राजा, माजीद मेनन, प्रफुल्ल पटेल, सतीश मिश्रा, कनीमोळी, रामगोपाल यादव, संजय सिंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

आजच्या बैठकीत ईव्हीएमशी छेडछाड झाल्याबद्दल विरोधी नेत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. निवडणूक आयोगाने न्यायालयीन निर्देशांनुसार 5 ईव्हीएममधील निकाल व्हीव्हीपॅटद्वारे पडताळण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र एका जरी यंत्रात गडबड वा तफावत आढळली, तरी त्या लोकसभा मतदारसंघांतील साऱ्या विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएमची तपासणी व मतगणना व्हीव्हीपॅटद्वारे करावी, असी मागणी विरोधकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com