धक्कादायक! माजी आमदाराला मरेपर्यंत मारहाण; मुलगाही जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

उत्तर प्रदेशच्या लखीमपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादावरुन माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे

लखनौ- उत्तर प्रदेशच्या लखीमपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादावरुन माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या मुलालाही जबर मारहाण करण्यात आली आहे. माजी आमदाराऱ्या कुटुंबीयांनी पोलिसांनावर हल्लेखोरांसोबत मिळाल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, लखीमपुरच्या पोलिस अधीध्यकांनी सांगितलं की, जमिनीच्या प्रकरणावरुन झालेल्या वादविवादात माजी आमदार अचानक खाली पडले. त्यांनतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

चिदंबरम यांच्या केंद्र सरकारला सूचना; सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणार?

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार लखीमपूर खीरीच्या त्रिकोलिया पढुआ येथे घडला. निघानस विधानसभा मतदारसंघातून निर्वेंद्र कुमार मिश्रा उर्फ मुन्ना दोन वेळा अपक्ष आणि एकवेळा समाजवादी पक्षाच्या तिकीटावरुन आमदार झाले आहेत. रविवारी काही लोकांनी त्यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. लोकांनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या मुलालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. माजी आमदाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोपींना वाचवत असल्याचा आरोप लावला आहे. शिवाय पोलिसांनी आरोपींना इतर ठिकाणी घेऊन गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

पोलिसांची माहिती आणि कुटुंबीयांचा आरोपात तफावत

लखीमपुरच्या पोलिस अधीक्षकांनी जमिनीच्या मुद्द्यावरुन हा वाद झाल्याचं सांगितलं आहे. जमिनीच्या वादावरुन दोन गटात वाद सुरु होता. यावेळी माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अचानक ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mla died due to beating over land dispute said police up