esakal | चिनी सैनिकांच्या कुरापतीचा पुरावा; भाला आणि रायफल घेऊन घुसखोरी करत असल्याचं उघड
sakal

बोलून बातमी शोधा

china pla.jpg

पँगोंग तलावाच्या दक्षिण भागात चिनी सैन्य भाले आणि ऑटोमॅटिक रायफलसह आल्याचं समोर आलं आहे.

चिनी सैनिकांच्या कुरापतीचा पुरावा; भाला आणि रायफल घेऊन घुसखोरी करत असल्याचं उघड

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पँगोंग तलावाच्या दक्षिण भागात चिनी सैन्य भाले आणि ऑटोमॅटिक रायफलसह आल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील एक फोटो समोर आला असून चिनी सैन्य संपूर्ण तयारीनिशी याभागात आला होता, हे स्पष्ट होत आहे. १५ जून रोजी झालेल्या रक्तरंजित संघर्षासारखा पुन्हा झगडा करण्यासाठी चीनची पिपब्ल लिबरेशन आर्मी येथे आल्याची शक्यता आहे.

चीनच्या दादागिरीचा पहिला आणि थेट पुरावा समोर आला आहे. यात चिनी सैनिक भाले आणि रायफल बाळगत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मंगळवारी चीन आणि भारताचे सैनिक आमनेसामने आले होते. भारतीय सैनिकांनी दक्षिण पँगोंग तलावाच्या परिसरातील भागावर ताबा मिळवल्याने चीन खवळला आहे. या पार्श्वभूमीवर चिनी सैनिक दादागिरी करत मुखपरी परिसरात आले होते. भारतीय सैनिकांनी त्यांच्याकडे पाहून ओरडलं आणि त्यांना आपली शस्त्र दाखवली. पीएलएने सीमा ओलांडल्यास गोळ्या चालवण्याचा इशारा दिला. उत्तर म्हणून चीनच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती लष्कराने दिली आहे.

अखेर गोळी सुटलीच; लक्ष्मणरेषा ओलांडल्याचं म्हणत चीनकडून युद्धाची धमकी

एनडीटीव्हीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यात चिनी सैनिक रेझान ला आणि मुखापरी येथे भारताच्या ठाण्याजवळ उभे असल्याचं दिसत आहे. चिनी सैनिकांनी भारताच्या भागात येण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांना तसं न करण्याचा इशारा देताच चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. गेल्या काही दिवसांपासून चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने चीनला जशासतसे उत्तर देत दक्षिण पँगोंग भागात आपला ताबा मिळवला आहे. चीनने यावर आक्षेप घेत भारतीय सैन्याला वापस जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, भारत सैनिक त्याठिकाणी ठाण मांडून आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांचा १५ जून सारखा संघर्ष करण्याचा इरादा होता. ज्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनचीही या संघर्षात जीवितहानी झाली आहे, पण चीनने याबाबत काही माहिती दिली नाही. याआधी, चीनने दोनदा उकसवण्याचं काम केलं आहे. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैनिक पूर्णपणे सतर्क होते. सैनिकांनी पीएलएचा डाव उधळून लावला होता. 

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत चीनने पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत चक्क गोळीबार केल्याने ताबा रेषेवर अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला आहे. तब्बल ४५ वर्षांनंतर या भागांमध्ये चिनी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. भारत-चीनदरम्यानचा तणाव गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १०) परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची मॉस्को येथे होणारी बैठक निर्णायक ठरणार आहे.

(edited by- kartik pujari)

loading image