esakal | Exit Polls : तामिळनाडूत डीएमके आघाडीला पूर्ण बहुमत, पुदुच्चेरीत भाजपा रोवणार झेंडा

बोलून बातमी शोधा

stalin_rahul_modi

Exit Polls : तामिळनाडूत डीएमके आघाडीला पूर्ण बहुमत, पुदुच्चेरीत भाजपा रोवणार झेंडा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : देशात नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. आज पश्चिम बंगालमध्ये आठव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर या पाचही राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल यायला सुरुवात झाली आहे. यांपैकी तामिळनाडू राज्यातील आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतदानानोत्तर चाचण्यांचे कल समोर आले आहेत. यामध्ये तामिळनाडूत डीएमके आणि काँग्रेस आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर पुद्दुचेरीत भाजप बाजी मारेल असा अंदाज आहे.

एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूच्या २३४ विधानसभा जागांसाठी काँग्रेस-डीएमके आघाडीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेस-डीएमके आघाडीला ४६.७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजप-इतर पक्षांना ३५ टक्के मतं मिळतील. अन्य पक्षांच्या खात्यात १८.३ टक्के मतं पडतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. २३४ जागांच्या तामिळनाडू विधानसभेसाठी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखाली एआयडीएमकेनं विजय मिळवला होता. जयललिता यांच्या निधनानंतर एआयडीएमके मैदानात आहे, पण या पक्षाला डीएमकेकडून मोठी टक्कर मिळत आहे.

पुदुच्चेरीत भाजप मारणार बाजी

पुदुच्चेरीत ३० जागांसाठी ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यावेळी ८१.६४ टक्के मतदान झालं होतं. दरम्यान, एबीपी आणि सी-वोटरने केलेल्या सर्वेक्षणात भाजप १९ ते २३ जागा मिळवून सत्ता काबीज करेल असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ६ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना १ ते २ जागा मिळतील. तसेच रिपब्लिक-सीएनएक्सच्या चाचणीत एनडीएला १६ ते २० जागा, काँग्रेसला ११ ते १३ जागा तर इतर पक्षांना शून्य जागा मिळतील असा अंदाज आहे. पुदुच्चेरीत १६ जागा ही मॅजिक फिगर आहे.