यंदा विक्रमी धान्योत्पादनाची आशा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अन्नधान्याचे उत्पादन २९.१९५ कोटी टन होईल. तर गहू आणि तांदळाचेही विक्रमी उत्पादन असेल. 

नवी दिल्ली - २०१९-२० च्या हंगामासाठी धान्योत्पादनाचा दुसरा सुधारीत अंदाज कृषी खात्याने आज जाहीर केला. मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यंदा विक्रमी धान्योत्पादन अपेक्षित असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या अंदाजानुसार अन्नधान्याचे उत्पादन २९.१९५ कोटी टन होईल. तर गहू आणि तांदळाचेही विक्रमी उत्पादन असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृषी खात्याने राज्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे सुधारीत अंदाजाची आकडेवारी आज जाहीर केली. यानुसार 29.195 कोटी टन धान्योत्पादन होईल. मागील वर्षीच्या धान्योत्पादनाच्या तुलनेत ही वाढ 67.4 लाख टनांची असली तरी 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत तब्बल 2.62 कोटी टनांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तांदूळ उत्पादन 11.74 कोटी टन आणि गव्हाचे उत्पादन 10.621 कोटी टन असेल. तांदळाचे उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 96.7 लाख टनांनी तर गव्हाचे उत्पादन पंचवार्षिक सरासरीच्या 1.16 कोटी टनांनी वाढीव असल्याचा सरकारने दावा केला आहे. दुसऱ्या सुधारीत अंदाजानुसार यंदा भरड धान्याचे उत्पादन 4.524 कोटी टन आणि ज्वारीचे उत्पादन 2.808 कोटी टन होईल. यासोबतच कडधान्ये आणि तेलबियांचे देखील वाढीव उत्पादन अपेक्षित आहे. यामध्ये तूर उत्पादन 36.9 लाख टन होईल. तर हरभरा उत्पादन 1.122 कोटी टनांवर जाईल. तेलबियांचे एकत्रित उत्पादन 3.419 कोटी टन अपेक्षित आहे. त्यात सोयाबिन 1.363 कोटी टन, मोहरी 91.1 लाख टन, भुईमूग 82.4 लाख टन यांचा समावेश आहे. याखेरीज कपाशीच्या 3.489 कोटी गासड्यांचेही (प्रति गासडी 170 ग्राम) उत्पादन होऊ शकते. तर ऊस उत्पादन 35.385 कोटी टनांवर जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expected record grain production this year