राम मंदिर निर्माणासाठी किती खर्च येईल?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 5 August 2020

मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. 

अयोध्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राम मंदिराचे भूमिपूजन केले. 40 मिनिट चाललेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची उपस्थिती होते. भूमिपूजनानंतर मंदिराचे निर्माण कार्य आता सुरु होणार आहे. मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान मोदींनी 29 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ; अयोध्येत येताच झाली पूर्ण

मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. शिवाय मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येईल. मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट  होती. आता ती 280 ते 360 फूट करण्यात येईल.

जेथे रामलल्लाचा गाभारा बनणार आहे, त्याच्यावरील भागालाच शिखर केलं जाणार आहे. मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी घुमटांची संख्या पाच करण्यात आली आहे. राम मंदिराच्या पाच घुमटांच्या खाली चार भाग असणार आहेत. येथे सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप बनवले जाणार आहेत. येथे भाविकांच्या बसण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जागा असेल. मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी मंदिराच्या जमिनीचे क्षेत्रफळही वाढवण्यात आले आहे. माती परिक्षणाच्या आधारावर मंदिराच्या पायाची खोली ठरवली जाईल. पायाची खोली 20 ते 25 फूट असू शकते. राम मंदिराच्या नव्या मॉडेलमध्ये एकूण 318 खांब असणार आहेत. 

25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावर राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र देणग्यांसाठी अभियान चालवणार आहे. याशिवाय ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या आहेत. विश्व हिंदू परिषद मोठ्या प्रमाणात देणग्यांसाठी अभियान चालवणार आहे. परिषदेने 5 लाख गावातील 10 करोड परिवारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विश्व हिंदू परिषद लोकांना कमीतकमी 100 रुपयांचे दान करण्याचे आवाहन करणार आहे. द प्रिंटने दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टकडे आतापर्यंत 15 करोड रुपये जमा झाले आहेत. 

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात जवान आणि कोरोना; काय आहे संबंध?

मंदिर निर्माणासाठी नक्की किती खर्च येईल, याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, राम मंदिराच्या निर्माणासाठी जवळजवळ 300 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय मंदिर परिसरातील पूर्ण जमिनीचा विकास करण्यासाठी 1000 करोड रुपये खर्च येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, रामलल्लाच्या जून्या मूर्त्याच नव्या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येणार आहेत. सध्या त्यांना मानस भवनमध्ये तात्पूरतं ठेवण्यात आलं आहे. मंदिर बांधूम पूर्ण झाल्यानंतर रामलल्लाची मंदिरात स्थापना करण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 

(edited by-kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: expenditure and expected time period for ayodhya ram mandir construction