फडणवीस दिल्लीत; मोदींबरोबर चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर राज्यातील खासदारांची बैठक झाली. त्यालाही मुख्यमंत्री उपस्थित होते. 

राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने दिल्लीतील सत्तारूढ वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. मराठा आंदोलनांपूर्वी शांततेत निघालेल्या मराठा मोर्चांची पुरेशी दखल राज्य सरकारने घेतली नाही व त्यामुळेच मराठा आंदोलनांचा वणवा पेटला, अशी भावना भाजप खासदारांमध्येही आहे. खासदारांनी हा मुद्दा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापुढेही उपस्थित केल्याचे समजते. 

फडणवीस यांनी मोदींची भेट घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी प्रस्तावित घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरही पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यात याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. 

सकारात्मक संदेश पोहोचवा - शहा 
खासदारांच्या बैठकीतही मराठा व अन्य समाजांच्या आरक्षण आंदोलनांबाबत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या वेळी पक्षाध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे बैठकीला उपस्थित होते. यापूर्वीच्या सरकारांनी आरक्षणाबाबत काहीही केले नाही. महाराष्ट्रातील भाजप सरकारची नीती व नियत चांगली असल्यानेच मराठा आरक्षणाबाबत ठोस तोडगा काढण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा ठोस संदेश राज्यभरात पोहोचवा, असे निर्देश शहा यांनी सत्तारूढ खासदारांना दिल्याचे समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis Discussion with Modi in Delhi