हवाला रॅकेटविरोधात ‘प्राप्तिकर’ची कारवाई, कोट्यवधींची माया उघड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

प्राप्तिकर विभागाने आज अनेक बड्या शहरांतील हवाला ऑपरेटर आणि अन्य काही खासगी व्यक्तींच्या मालकीच्या कार्यालयांवर छापे टाकले.

नवी दिल्ली, ता.२७ (पीटीआय) ः प्राप्तिकर विभागाने आज अनेक बड्या शहरांतील हवाला ऑपरेटर आणि अन्य काही खासगी व्यक्तींच्या मालकीच्या कार्यालयांवर छापे घालत तब्बल ५.२६ कोटी रुपयांची रोख, दागिने आणि अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या सर्वांनी सरकारला आर्थिक व्यवहारासंबंधीची खोटी बिले सादर केली होती, अशी माहिती केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी ) दिली आहे. 

दिल्ली एनसीआर, हरियाना, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही मंडळी ही सुसंघटित नेटवर्कच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवीत असल्याची माहिती तपास यंत्रणेला आधीच मिळाली होती. या मंडळींनी चुकीची बिले दाखवून मोठ्या प्रमाणावर माया जमविली होती असे उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे वाचा - लॉकडाउन जैसे थे; अनलॉक 5 चे नियम 30 नोव्हेंबरपर्यंत कायम

या कारवाईमध्ये २.३७ कोटी रुपयांची रोख आणि २.८९ कोटी रुपयांचे दागिने अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून ते सतरा बॅंकांतील लॉकरमध्ये ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांची ही कारवाई सुरूच होती. 

सीबीडीटीचे एक प्रशासकीय प्राधिकरण आहे. सीबीडीटीने सांगितलं की, अँटी ऑपरेटर, लाभार्थी, कंपन्या आणि त्यांचे नेटवर्क चालवणाऱ्यांची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अफरातफरीचे पुरावे सापडले असून जप्त करण्यात आले आहेत. 

या प्रकरणी तपास सुरू असून संबंधितांची मालमत्ता काही प्रमुख शहरांमध्ये असल्याचं समजते. तसंच शेकडो कोटी रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. आयकर विभागाने दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यासह 42 ठिकाणी छापे टाकले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake-billing-case-income-tax-raid in 5 state

टॉपिकस
Topic Tags: