हाथरसप्रकरणी आज सुनावणी; पीडित कुटुंब कडक सुरक्षा व्यवस्थेत लखनऊला रवाना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

पीडित कुटुंबाला रविवारी रात्रीच लखनऊला नेण्याची पोलिसांची योजना होती. परंतु, कुटुंबीयांनी जीवाला धोका असल्याचे सांगत रात्री जाण्यास नकार दिला होता.

हाथरस- कडक सुरक्षा व्यवस्थेत हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंब राज्याची राजधानी लखनऊला रवाना झाले. सोमवारी (दि.12) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. कुटुंबाचे सदस्य पहाटे पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर लखनऊकडे रवाना झाले. 

उपविभागीय अधिकारी अंजली गंगवार या स्वतः त्या कुटुंबीयांबरोबर जात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकही बरोबर असतील. न्यायालयात कुटुंबीय आपला जबाब नोंदवतील. मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचे वडील, आई-भावासह पाच जण न्यायालयात जबाब नोंदवतील. 

दरम्यान, पीडित कुटुंबाला रविवारी रात्रीच लखनऊला नेण्याची पोलिसांची योजना होती. परंतु, कुटुंबीयांनी जीवाला धोका असल्याचे सांगत रात्री जाण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने हाथरस प्रकरणाची स्वतः दखल घेतली होती. न्यायालयाने मुख्य गृह सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. 

हेही वाचा- कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक;येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी

दि. 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा क्षेत्रात एका 19 वर्षीय दलित युवतीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. या मुलीला आधी अलीगडच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले होते. तिथे 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर या घटनेविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family members of Hathras gang rape victim leave for Lucknow