राष्ट्रपती भवनावर मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी नाकारली; तीनच नेत्यांना चर्चेसाठी जाता येणार

टीम ई सकाळ
Thursday, 24 December 2020

कृषी कायद्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा करतील आणि कृषी कायद्याला मागे घेण्याच्या मागणीसह दोन कोटी स्वाक्षऱ्या असलेलं पत्र देतील. 

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यावरून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. आता काँग्रेसही या आंदोलनात रस्त्यावर उतरले असून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या कायद्याला मागे घेण्याची मागणी करत राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असल्याची माहिती दिली आहे. मात्र तीन नेते राष्ट्रपतींसोबत चर्चा करू शकतात असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं. 

दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र 3 नेते राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी जाऊ शकतात. दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आम्ही राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढू असं म्हटलं आहे. 

राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौकातून राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेस नेत्यांसोबत मोर्चा करणार होते. यामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदारही सहभागी होणार होते. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा करतील आणि कृषी कायद्याला मागे घेण्याच्या मागणीसह दोन कोटी स्वाक्षऱ्या असलेलं पत्र देतील. 

आंदोलन शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं असून म्हटलं आहे की, चर्चा पुन्हा सुरु करण्यासाठी नवीन प्रस्ताव सरकारने आणावा. तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, यातून मार्ग काढण्याचा चर्चा हाच एक पर्याय आहे आणि सरकार कृषी क्षेत्रात सुधारणासाठी बांधील आहे. 

हे वाचा - केंद्र सरकारने आगीशी खेळू नये; शेतकरी नेत्यांचा इशारा

नव्या कृषी कायद्यांना मागे घेण्याच्या मागणीबाबत सरकार आणि आंदोलकांमधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुक्रवारी 6 राज्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी केंद्राकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत ते सांगण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest delhi police say no permission to congress for march on rashtrapati bhavan