esakal | शेतकऱ्यांना अडवाल तर खबरदार
sakal

बोलून बातमी शोधा

 टिकैत

शेतकऱ्यांना अडवाल तर खबरदार- टिकैत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा व्यापक आविष्कार शेतकरी महापंचायतीच्या रूपाने उद्या (ता.५) मुझफ्फरनगर येथे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या महापंचायतीला यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनने देखील तयारी केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्यास हा विरोध मोडून काढण्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला.

हेही वाचा: जागतिक नेत्यांमध्ये मोदी पुन्हा 'नंबर वन'; बायडन यांच्यासह अनेक दिग्गज मागे

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही महापंचायत होणार आहे. त्यासाठी दोन लाख शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. टिकैत यांनी मात्र किती शेतकरी या महापंचायतीसाठी उपस्थित राहणार, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा त्यांनी केला आहे. पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे.

दिल्ली सीमा म्हणजे सिंघू, गाझी आणि टिकरी सीमा या धरणे स्थळांवरून महापंचायतीकडे अनेक शेतकरी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातूनही शेतकरी येणार असल्याचे सांगण्यात येत आहो. ही महापंचायत उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे तेथील सरकारही सजग झाले आहे. महापंचायतीसाठी प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुझफ्फरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची अडवणूक केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत टिकैत यांना विचारले असता, त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘महापंचायत शांततेच्या मार्गाने होईल. परंतु त्यापासून शेतकऱ्यांना अडविणार असेल, तर त्यांचा हा विरोध मोडून काढू ’’

सुरक्षा व्यवस्था तैनात

महापंचायतीसाठी सुमारे पाच हजार स्वयंसेवकांना जबाबदारी देण्यात आली आहे. व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. ज्यांना गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी पोहचता येत नाही, त्यांच्यासाठी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था किसान सभेने केली आहे. पोलिसांनी देखील सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. याशिवाय या कार्यक्रमाची व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.

loading image
go to top