
26 जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचे गालबोट लागले.
नवी दिल्ली- 26 जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आयोजित केलेली ट्रॅक्टर परेड आपला निर्धारित मार्ग सोडून दिल्लीत शिरली आणि हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या. शेतकरी आणि पोलिसांमध्ये ठिकठिकाणी झटापटी झाल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, तर शेतकऱ्यांनीही पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसलं. त्यातच दिल्लीतील संघर्षाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
गलवानमधील शहीद जवानांना वीरता पुरस्कार दिल्याने चीनचा तीळपापड; जाणून घ्या खरं...
दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याचा मार्ग धरला. लाल किल्लावर आलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ एनएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांवर काठ्यांनी हल्ला केल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांच्या या हल्ल्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी 15 ते 20 पोलिसांनी लाल किल्ल्याच्या इमारतीवरुन उड्या मारल्या. जवळपास 15 फूटांच्या या भिंतीवरुन पोलिसांनी उड्या मारल्या. या भिंतीवरुन उड्या मारण्याखेरीज या पोलिसांकडे इतर कोणताही पर्याय नव्हता. यात अनेक पोलिस जखमी झाल्याचं कळत आहे.
मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दरम्यान लाल किल्ला आणि आयटीओ परिसरात संघर्ष झाला. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेड प्रकरणी 15 FIR दाखल केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. हजारो शेतकर्यांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पोलिसांनी बनवलेले बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांशी दोन हात केले, वाहने तोडली आणि लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला होता. त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण आहे.
#WATCH | Delhi: Protestors attacked Police at Red Fort, earlier today. #FarmersProtest pic.twitter.com/LRut8z5KSC
— ANI (@ANI) January 26, 2021
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवलीये, पण कायदे रद्द करणार नसल्याचं म्हटलं आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत 11 चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत, पण अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.