गलवानमधील शहीद जवानांना वीरता पुरस्कार दिल्याने चीनचा तीळपापड; जाणून घ्या खरं कारण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 27 January 2021

मागील वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला.

बिजिंग- मागील वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे जवान शहीद झाले होते. चीनचेही काही सैनिक मारले गेले होते, पण याची वाच्यता न करता चीनने हे प्रकरण दाबून टाकले. दुसरीकडे भारताने गलवान खोऱ्यातील शहीद जवानांचा सन्मान केला आहे. भारताच्या या कृतीवर चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांचा वीरता पुरस्कार देऊन सन्मान करणे दोन्ही देशातील तणाव वाढवण्याचे पाऊल असल्याचं चीनने म्हटलं आहे. 

Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे

गलवान खोऱ्यात शहीद झालेले 16 व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांना दुसरा सर्वात मोठा सन्मान महावीर चक्र देण्यात आला. तसेच इतर सैनिकांना वीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. यावरुन चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने संताप व्यक्त केला आहे. ग्लोबल टाईम्सने चिनी तज्ज्ञाच्या हवाल्याने लिहिलंय की, भारतासोबतच्या नवव्या चर्चेच्या फेरीदरम्यान काही सकारात्मकता दिसली होती, तसेच चीनही शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, भारताने उचलल्या पाऊलामुळे जगात आणि आमच्या लोकांना स्पष्ट संदेश जातोय की त्यांना यावर काही तोडगा नको आहे. भारताला सीमेवर शांतता आणि स्थिरता नको आहे.  

शांघाई इन्स्टि्यूट फॉर इंटननॅशनल स्टडीजमध्ये सेंटर फॉर एशिया-पॅसिफिकचे डायरेक्टर झाओ गानछेंगने ग्लोबल टाईम्सला म्हटलंय की, महामारी, आर्थिक मंदी आणि शेतकरी आंदोलनाने घेरला गेलेला भारत चीनविरोधी कृती करुन लोकांचे लक्ष हटवू पाहात आहे. थंडीचे दिवस संपल्यानंतरही तणाव कायम राहणार आहे. चीनला संतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे

चीनसंबंधी विषयांचे अभ्यासकांचे म्हणणं आहे की, भारतीय सैनिकांचा सन्मान झाल्याने चीन बैचेन झाला आहे. कारण, त्यामुळे चीनच्या सैनिकांमध्ये विद्रोह होऊ शकतो. भारताच्या सैनिकांचा सन्मान झाल्याने चीनच्या सैनिकांमध्येही अशी मागणी होऊ शकते. पण, चीनला आपल्या शहीद जवानांची माहिती समोर आणायची नाही. चीनने आपल्या मारले गेलेल्या सैनिकांना चुपचाप पुरले होते. देशाला त्याने त्यांचे नावही सांगितले नाही. 

दरम्यान, 15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचे अधिक संख्येने सैनिक मारले गेल्याचे सांगितले जाते. चीनने याबाबत कोणताही खुलासा केला नाही. पण, भारताने शहीदांचा सन्मान केला आहे. भारताने गलवान खोऱ्यात सैनिकांच्या सन्मानार्थ याआधीच एक स्मारक बनवलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: galwan valley indian martyrs award china global times comment