'किसान गणतंत्र परेड' होणारच! सरतेेशेवटी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच, असा शेतकऱ्यांचा निर्धार होता.

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 60 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 10 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. तर एकीकडे शेतकरी येत्या प्रजासत्ताक दिनाला 'किसान गणतंत्र परेड' अशी ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्या पुढे रेटायचा प्रयत्न करण्यासाठी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार  हरतर्हेचे प्रयत्न करत होते. सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच, असा शेतकऱ्यांचा निर्धार होता. मात्र, सरतेशेवटी दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.

दिल्लीतील सर्व अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच सीएपीएफ आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या अन्य दलांना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात अलर्ट करण्याचे आदेश दिले गेले आहेत. दिल्ली  पोलिस कमिश्नर यांनी सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही व्यवस्था केली गेली आहे. 

शेतकऱ्यांसोबत दिल्ली पोलिसांची बैठक झाली. यानंतर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी म्हटलं की, ट्रॅक्टर रॅलीसाठी आमच्या ठरवलेल्या मार्गाला पोलिसांची लिखित परवानगी मिळाली आहे. पाच मार्गांवर 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. त्यांनी पुढे म्हटलं की, 'हम दिल्ली नहीं दिल जीतने आ रहे हैं'

ट्रॅक्टर परेडचा मार्ग तयार
26 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडचा मार्ग नियोजित आहे. शेतकऱ्यांनी गाजीपूर बॉर्डरवर परेडसाठीचा मार्ग ठरवला आहे. यानुसार, युपी गेटवरुन परेड सुरु होईल. ती आनंद विहार ते सीमापूरहून मेरठ तिराहे पर्यंत जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Protest Delhi Police Commissioner gave permission to Kisan tractor rally